पुणे, दि. १२ नोव्हेंबर २०२५ : “पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पीएमआरडीए हद्दीतील लोकसंख्या २०५० पर्यंत तब्बल दोन कोटींच्या घरात पोहोचेल. शहराची झपाट्याने वाढ होत असताना नियोजनबद्ध विकासासाठी काही कठोर निर्णय घेणे आवश्यक आहे,” असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
आंबेगाव बुद्रूक येथील चिंतामणी चौक ते निलगिरी चौक दरम्यान ‘दत्तक रस्ता योजना’ राबविण्यात आली असून, या रस्त्याचे सुशोभीकरण, स्वच्छता, प्रकाशयोजना व सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची कामे पूर्ण झाली आहेत. या उपक्रमाचे उद्घाटन बुधवारी अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी., ओमप्रकाश दिवटे, पथ विभाग प्रमुख अनिरुद्ध पावसकर, उपायुक्त माधव काटकर, माधव जगताप, सहाय्यक आयुक्त सुरेखा भणगे, शहराध्यक्ष सुभाष जगताप, माजी महापौर दत्ता धनकवडे, तसेच चिंतामणी व्यासपीठाचे अध्यक्ष आप्पा रेणुसे उपस्थित होते.
अजित पवार म्हणाले, “शहराचा विकास आराखडा दूरदृष्टीने तयार करणे गरजेचे आहे. पुढील ५० वर्षांचा विचार करून विकासाला प्राधान्य दिले पाहिजे. मुंबईप्रमाणे पुण्यातही सदनिकांच्या किंमती वाढल्या आहेत. रेरा आणि एसआरए प्रकल्पांच्या माध्यमातून शहर झोपडपट्टीमुक्त करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. राज्य सरकारकडून पुणे महापालिकेला आवश्यक निधी मिळावा यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.”
पुढे बोलताना ते म्हणाले, “चिंतामणी चौक ते निलगिरी चौक हा रस्ता ‘दत्तक रस्ता योजने’अंतर्गत अत्यंत आकर्षक बनविण्यात आला आहे. नागरिकांनीही स्वच्छतेला प्राधान्य द्यावे, म्हणजे शहर अधिक सुंदर आणि राहण्यायोग्य बनेल.”

More Stories
Pune: पुण्यात पुन्हा फ्लेक्स भाषेचा सुळसुळाट प्रशासनाचे दुर्लक्ष
पुणे: इच्छूकांकडून जुळवा जुळव सुरू तिकिटासाठी; सर्वच पक्षांचा घेतला जातोय अंदाज
Pune: नगरपरिषद व नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी