November 15, 2025

पुणे: इच्छूकांकडून जुळवा जुळव सुरू तिकिटासाठी; सर्वच पक्षांचा घेतला जातोय अंदाज

पुणे, १२ नोव्हेंबर २०२५ : महापालिकेच्या प्रभाग रचनेनंतर आता प्रभागांचे आरक्षण निश्चित झाल्याने आरक्षण सोयीचे पडलेल्या इच्छूकांकडून उमेदवारीसाठी जुळवा जुळव सुरू करण्यात आली आहे. तर, ज्या प्रभागांमध्ये महिला आरक्षण पडले आहे त्या इच्छूकांनी कुटूंबातील महिला सदस्यांचे बोर्ड, बॅनर्स सोशल मिडीयात झकळविण्यास सुरूवात केली आहे. तर, दुसरीकडे विद्यमान नगरसेवकांमध्ये आपले गणित कसे बसे याचे आडाखे बांधत इतर पक्षातून तिकीट मिळविण्य़ासाठीही चाचपणी सुरू करण्यात आली आहे. तर, अनेकांनी सोशल मिडीयावर थेट प्रचारालाही सुरूवात केली असून आरक्षणानंतर पक्ष कार्यालय, नेत्यांचे कार्यक्रम तसेच सोबत लढण्यासाठी इच्छूक असलेल्या इतर उमेदवारांच्याही भेटी घेण्य़ासही सुरूवात करण्यात आली आहे. तर अनेक इच्छूकांकडून बुधवारी दिवसभर महापालिकेत प्रभागातील समस्यांची निवेदन घेवून अधिकाऱ्यांची भेट घेत फोटोसेशनही सुरू करण्यात आल्याचे पहायला मिळाले.
———————
तिकिटासाठी चाचपणी सुरू
सर्वसाधारणपणे चार सदस्यांच्या प्रभागात अपक्ष निवडून येणे जिकरीचे असते. त्यामुळे निवडणूकीसाठी राष्ट्रीय तसेच प्रादेशिक पक्षाची उमेदवारी मिळाल्यास निवडणूक सोपी जाते त्यामुळे आरक्षणाच्या सोडतीनंतर अनेकांनी आता तिकिटासाठी चाचपणी सुरू केली आहे. त्यासाठी, इच्छूकांकडून तिकिट हव्या असलेल्या पक्षांच्या शहराध्यक्षांशी गुरूवारी दिवसभर संपर्क साधला जात होता. तर अनेक पक्षांच्या इच्छूकांनी त्यासाठी पक्षाच्या कार्यालयाची पायरी चढत पक्ष कार्यालयात गर्दी केल्याचे पहायला मिळाले. त्यात, प्रमुख्याने अनेक इच्छूक भाजपकडून लढण्यास इच्छूक असून संधी न मिळाल्यास राष्ट्रवादी काॅग्रेसकडून तिकिटासाठी चाचपणी केली जात असून तर काही जण राष्ट्रवादी काॅग्रेस शरद पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे, आता प्रभाग आणि आरक्षण सोयीचे पडल्याने तिकिटासाठी चाचपणी सुरू करण्यात आली आहे.

घर कारभारीण झळल्या फ्लेक्सवर
महापालिकेच्या १६५ मधील सुमारे ८३ जागा महिलांसाठी राखीव असणार आहेत. त्यातच, विद्यमान नगरसेविकांसह अनेक प्रभागामध्ये खुल्या जागांवर महिलांचे आरक्षण पडल्याने अनेक नगरसेवकांची कोंडी झाली असून त्यांना आता निवडणूकीसाठी घरातील महिलांना संधी द्यावी लागणार आहे. त्या सोबतच निवडणूकीची तयारी केलेल्या इतर इच्छूकांनाही घरातील महिलांना संधी द्यावी लागणार आहे. त्यामुळे, त्यामुळे राजकारणापासून चार हात दूर असलेल्या इच्छूकांच्या घर कारभार संभाळणाऱ्या घरातील महिला फ्लेक्सवर झळकण्यास सुरूवात झाली असून कोणाकडून पत्नीला, कोणाकडून आईला तर कोणाकडून मुलींना संधी दिली जाणार असल्याचे या फ्लेक्सवरून लक्षात येत आहे.