पुणे, १२ नोव्हेंबर २०२५: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने पुणे आणि पिंपरी-चिंचवडकरांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. पीएम-ई ड्राईव्ह योजनेंतर्गत पुणे महानगर परिवहन महामंडळाला (पीएमपीएमएल) एक हजार इलेक्ट्रिक बस खरेदीस मंजुरी देण्यात आली आहे. केंद्रीय अवजड उद्योग मंत्री एच.डी. कुमारस्वामी यांनी या प्रस्तावावर अंतिम शिक्कामोर्तब केल्याची माहिती केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी बुधवारी दिली.
या निर्णयामुळे पुणे-पिंपरी चिंचवड परिसरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला नवा वेग मिळणार असून, शहरातील वाहतूक कोंडी आणि वायूप्रदूषण या दोन्ही समस्यांवर तोडगा निघण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
मोहोळ म्हणाले, “पुण्याच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र सरकार वचनबद्ध आहे. पीएमपीएमएलच्या माध्यमातून नागरिकांना स्वस्त, पर्यावरणपूरक आणि कार्यक्षम वाहतुकीचा पर्याय देण्यासाठी या बसेस मोठी भूमिका बजावतील. माझा सातत्यपूर्ण पाठपुरावा आता फळास आला आहे.”
सध्या पीएमपीएमएलकडे २००० बसांचा ताफा असून, त्यात ७५० स्वमालकीच्या आणि उर्वरित ठेकेदारांकडील बस आहेत. शहराच्या वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत किमान तीन हजार बसांची गरज असल्याने ही मंजुरी अत्यंत महत्वाची मानली जात आहे.
मोहोळ यांनी स्पष्ट केले की, “या प्रस्तावासाठी मी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन राज्य शासनाकडून रिझर्व्ह बँकेला आवश्यक पत्र पाठविण्याची प्रक्रिया वेगाने पूर्ण केली. त्यानंतर पीएमपीएमएलमार्फत प्रस्ताव केंद्रीय मंत्रालयाकडे पाठविण्यात आला. अखेर केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीत या प्रस्तावाला हिरवा कंदील मिळाला.”
पुण्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या सशक्तीकरणावर मोहोळ यांनी भर दिला आहे. ते म्हणाले, “पुणे मेट्रोचे ३२ किलोमीटर मार्ग कार्यान्वित आहेत, शिवाजीनगर–हिंजवडी मेट्रो मार्गही लवकरच सुरू होईल. आता ई-बसच्या समावेशामुळे मेट्रो आणि बस सेवा यांचे एकत्रित नेटवर्क नागरिकांसाठी सोयीस्कर ठरेल.”
मोहोळ यांनी या निर्णयाबद्दल केंद्र सरकारचे आभार मानताना म्हटले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेहमीच शहरी विकास आणि शाश्वत वाहतुकीला प्राधान्य दिले आहे. या मंजुरीमुळे पुणे-पिंपरी चिंचवडमधील वाहतुकीचे भविष्य ‘ग्रीन’ आणि ‘स्मार्ट’ बनणार आहे. यासाठी सहकार्य करणाऱ्या एच.डी. कुमारस्वामी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेही मी मन:पूर्वक आभार मानतो.”
या मंजुरीनंतर पुणेकरांना आधुनिक, स्वच्छ आणि शांत प्रवासाचा नवा अध्याय सुरू होणार असून, पीएमपीएमएलच्या ताफ्यातील या १००० ई-बस शहराच्या वाहतुकीत क्रांती घडवतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

More Stories
Pune: पुण्यात पुन्हा फ्लेक्स भाषेचा सुळसुळाट प्रशासनाचे दुर्लक्ष
पुणे: इच्छूकांकडून जुळवा जुळव सुरू तिकिटासाठी; सर्वच पक्षांचा घेतला जातोय अंदाज
Pune: शहरासाठी कठोर निर्णय घ्यावे लागतील – अजित पवार