पुणे, दि. 12 नोव्हेंबर 2025: नगरपरिषद व नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२५ शांततेत, निर्भय आणि न्याय्य वातावरणात पार पाडण्याच्यादृष्टीने पुणे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जितेंद्र डूडी यांनी भारतीय नागरीक सुरक्षा संहिता, २०२३ चे कलम १६३ अन्वये आदेश जारी केले आहेत, सदरचे आदेश ३ डिसेंबर २०२५ पर्यंत अंमलात राहणार असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
राजकीय पक्षांनी, निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी किंवा त्यांच्या प्रतिनिधीनी किंवा त्यांच्या हितचिंतक, मुद्रणालयाचे मालक व इतर सर्व माध्यमाद्वारे छपाई करणाऱ्या मालकाने तसेच प्रकाशकाने नमुना मतपत्रिका छापतांना पुढील बाबीवर निर्बंध घालण्यात येत आहेत. यामध्ये इतर उमेदवाराचे नाव व त्यांनी नेमून देण्यात आलेले चिन्ह वापरणे, आयोगाने निश्चित केल्याप्रमाणे नमूना मतपत्रिकेसाठी कागद वापरणे तसेच कागदाच्या आकारामध्ये नमुना मतपत्रिकेची छपाई करणे.
निवडणूक निर्णय अधिकारी, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय, सर्व उपविभागीय अधिकारी कार्यालये, सर्व तालुका दंडाधिकारी कार्यालये आणि सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालय व विश्रामगृह या ठिकाणी कोणत्याही प्रकारची मिरवणूक, सभा घेणे, मोर्चा काढणे, उपोषण करणे, कोणत्याही प्रकारच्या घोषणा देणे, वाद्य वाजविणे किंवा गाणी म्हणने इत्यादी. तसेच कोणत्याही प्रकारचा निवडणूक प्रचार करणे या बाबी करण्यास बंदी घालण्यात आली आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूक प्रचाराचे साहित्य, सार्वजनिक इमारतीचे ठिकाणी, सार्वजनिक रस्त्यावर निवडणूकी संबंधी पोर्स्टस, बॅनर्स, पॉम्प्लेटस, कटआऊटस, होर्डिंग्ज , कमानी आदी रहदारीस अडथळा निर्माण होईल व अपघात होईल अशा पध्दतीने लावण्यावर निर्बंध घालण्यात येत आहे. कोणत्याही राजकीय पक्षानी, निवडणूक लढविणा-या उमेदवारांनी, किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी निवडणूक प्रचारासाठी १० पेक्षा अधिक मोटार गाड्या, वाहनांचा ताफ्याचा वापर करण्यावर निर्बंध घालण्यात येत आहे.
निवडणूक प्रचारासाठी ध्वनीक्षेपकाचे वापरावरील निर्बंध: कोणतीही व्यक्ती, संस्था, पक्ष, कार्यकर्ते यांनी ध्वनीक्षेपकाचा वापर पोलीस अधिकाऱ्यांच्या परवानगी शिवाय करता येणार नाही. सकाळी ६ वाजण्यापूर्वी आणि रात्री १० वाजेनंतर कोणत्याही फिरत्या वाहनावर व कोणत्याही क्षेत्रात ध्वनीक्षेपणाचा वापर करता येणार नाही तसेच प्रचाराकरीता ध्वनी क्षेपकाचा वापर विशिष्ट ठिकाणी थांबूनच करावा, फिरणाऱ्या वाहनास रस्त्यावरुन धावत असतांना ध्वनीक्षेपकाचा वापर करता येणार नाही. सर्व राजकीय पक्ष आणि उमेदवार व इतर व्यक्तींनी निश्चित ठिकाणी ध्वनीक्षेपकाच्या वापरासंबंधीच्या परवानगीबाबत माहिती जिल्हादंडाधिकारी, संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी व संबंधित यंत्रणेस कळविणे बंधनकारक राहील.
प्रचाराकरिता वापरण्यात येणाऱ्या वाहनांवर पक्ष प्रचाराचे फलक लावणे, झेंडे लावणे आदीबाबत निर्बंध: फिरत्या वाहनांवर पक्ष प्रचाराचा झेंडा हा वाहनाच्या डाव्या बाजूला विंड स्क्रिन ग्लासच्यापुढे राहणार नाही आणि तो त्यावाहनाच्या टपापासून २ फुट उंधी पेक्षा जास्त राहणार नाही. प्रचाराच्या फिरत्या वाहनांवर कापडी फलक वाहन चालकाच्या आसनामागे वाहनाच्या डाव्या व उजव्या बाजूने लावण्यात यावा, इतर कोणत्याही बाजुस लावू नये. वाहनावर लावायचा पक्ष प्रचाराचा झेंडा किंवा कापडी फलक संबंधित पक्षाचे जिल्हाध्यक्ष उमेदवार, प्रतिनिधी, निवडणूक प्रचारासाठी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडून अधिकृत परवानगी घेतलेल्या वाहना व्यतिरिक्त इतर कोणत्याही वाहनांवर लावता येणार नाही.
या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीवर भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम २२३ तसेच इतर प्रचलित कायद्यांन्वये शिक्षेस पात्र राहील, असेही जिल्हादंडाधिकारी श्री. डुडी यांनी आदेशात स्पष्ट केले आहे.

More Stories
Pune: पुण्यात पुन्हा फ्लेक्स भाषेचा सुळसुळाट प्रशासनाचे दुर्लक्ष
पुणे: इच्छूकांकडून जुळवा जुळव सुरू तिकिटासाठी; सर्वच पक्षांचा घेतला जातोय अंदाज
Pune: शहरासाठी कठोर निर्णय घ्यावे लागतील – अजित पवार