पुणे, १३ नोव्हेंबर २०२५ : महापालिकेचे आरक्षण जाहीर होताच इच्छुक उमेदवारांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. या इच्छुकांंमार्फत शहरभर बेकायदेशीरपणे फ्लेक्स लावण्यात आले आहे. शहरातील अनधिकृत फ्लेक्स, फलकावर कारवाई करून गुन्हे दाखल करावे असे आदेश आयुक्त नवल किशोर राम यांनी दिले असतांना देखील शरातील राजकीय फ्लेक्सविरोधात कोणतीच कारवाई होतांना दिसत नाही. त्यामुळे या फलकांना पालिकेने अभय दिले आहे का ? असा सवाल नागरिकांनी केला आहे.
महापालिका निवडणुकांसाठीची आरक्षणाची सोडत जाहीर होताच शहरातील राजकीय वातावरण तापले आहे. इच्छुक उमेदवारांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवारांनी व त्यांच्या कार्यकर्त्यांनी नावासह बॅनर, शुभेच्छा संदेणारे मोठे पोस्टर, कट आउट जागोजागी लावले आहेत. हे फ्लेक्स शहरात जागोजागी झळकू लागले आहेत. त्यामुळे शहराचे मोठ्या प्रमाणात विद्रूपीकरण झाले आहे. शहरातील प्रमुख रस्ते, चौक, रस्त्यांच्या कडेला, सार्वजनिक इमारतींच्या भिंती, विद्युत खांब तसेच झाडांवरही मोठ्या प्रमाणात हे फलक व बॅनर लावण्यात आले आहे. याचा त्रास येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना होत आहे. हे फलक लावतांना कोणत्याही प्रकारे महापालिकेची परवानगी घेण्यात आली नाही. या बेकायदेशीर फलकांवर दंडात्मक कारवाई होणे आवश्यक आहे. परंतु, प्रत्यक्षात कारवाई होत नाही. हे फलक राजकीय असल्याने पालिकेने त्यांना अभय दिले आहे का ? असा प्रश्न सामाजिक कार्यकर्त्यांनी उपस्थित केला आहे. सामान्य नागरिकांनी फलक लावल्यास त्यांच्यावर तत्काळ कारवाई करून दंड ठोठावला जातो. मात्र, राजकीय फलकांवर कारवाई न करता ते तसेच राहतात.
आयुक्तांच्या आदेशाला अधिकाऱ्यांनी फासला हरताळ
शहराचे विद्रूपीकरण रोखण्यासाठी शहरभर लागलेले फ्लेक्स काढावेत आणि काही लोकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश आयुक्त नवल किशोर राम यांनी पदभार हाती घेताच दिले होते. शरात केवळ मोजकेच फलक असल्याचा दावा त्यावेळी करण्यात आला होता. दरम्यान, आयुक्तांच्या सुचनांनुसार आकाशचिन्ह विभागाने क्षेत्रीय कार्यालयाच्या मदतीने कारवाई करत काही जणांवर गुन्हे दाखल केले होते. तर काहींना नोटिसा बाजवण्यात आल्या होत्या. मात्र, गेल्या काही दिवसांपासून ही कारवाई थंड झाली आहे.जी कारवाई होते ती जाहिराती किंवा किरकोळ फलकांवर होते. मात्र, राजकीय फलकांवर कोणतीच कारवाई केली जात नाही.
क्षेत्रीय कार्यालयाकडून धुळफेक
शहराचे विद्रुपीकरण थांबवण्यासाठी महापालिकेने शहरातील अनधिकृत फ्लेक्सवर कारवाई करण्याची जबाबदारी क्षेत्रीय कार्यालयावर देखील आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांंनी क्षेत्रीय कार्यालयांना गुन्हे दाखल करण्याचे टार्गेट देखील दिले होते. त्यानुसार काही दिवस गुन्हे दाखल करण्यात आले. मात्र, ही कारवाई करताना प्रशासनाने भेदभाव करत राजकीय व्यक्तींना वगळले आहे. केवळ व्यावसायिक फ्लेक्सवर गुन्हे दाखल करून धुळफेक करण्याचे काम क्षेत्रीय कार्यालयाकडून होत आहे.
कारवाई तीव्र करून गुन्हे दाखल करणार
शहरात ज्यांनी ज्यांनी राजकीय फलक लावले आहे, अशा फलकांचे फोटो काढून त्यांची नोंद ठेवून गुन्हे दाखल केले जाणार आहे. शहरात राजकीय फलक, फ्लेक्स व बँंनर विरोधात आम्ही तीव्र कारवाई करणार आहोत. -माधव जगताप, उपयुक्त, आकाशचिन्ह विभाग

More Stories
पुणे: इच्छूकांकडून जुळवा जुळव सुरू तिकिटासाठी; सर्वच पक्षांचा घेतला जातोय अंदाज
Pune: शहरासाठी कठोर निर्णय घ्यावे लागतील – अजित पवार
Pune: नगरपरिषद व नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी