November 15, 2025

Pune: अल्पकालीन उपाययोजना तातडीने अमलात आणा- मुरलीधर मोहोळ यांचे निर्देश

पुणे, १५/११/२०२५: नवले पूल परिसरात अपघात थांबविण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करणे गरजेचे आहे. त्याला वेळ लागत असल्यास अपघात रोखण्यासाठी तातडीने करावयाच्या उपाययोजनांची जबाबदारी संबंधित यंत्रणांवर निश्चित करण्यात आली आहे. त्यानुसार अल्पकालीन उपाययोजना त्वरित अमलात आणाव्यात, असे निर्देश केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी शनिवारी दिले.

नवले पूल येथे झालेल्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी शनिवारी विविध यंत्रणांच्या प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या वेळी आमदार भीमराव तापकीर, महापालिका आयुक्त नवलकिशोर राम, पोलिस आयुक्त अमितेश कुमार, पीएमआरडीचे आयुक्त योगेश म्हसे, पोलिस अधीक्षक संदीपसिंग गिल राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी संजय कदम, प्रादेशिक परिवहन अधिकारी व अन्य उपस्थित होते.

या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही नेमके काय करता येईल, याबाबत सूचना केल्या आहेत. त्यानुसार जांभूळवाडी ते वडगाव विविध उपाययोजना करण्यात येणार आहेत.
जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या रस्ता सुरक्षा समितीची बैठक ठरल्याप्रमाणे नियमितपणे व्हायलाच हवी. सेवा रस्त्यांचे रखडलेले काम त्वरित पूर्ण झाले पाहिजे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने वडगाव पुलाच्या रूंदीकरणाचे काम तातडीने सुरू करावे, अशा स्पष्ट सूचना मोहोळ यांनी या बैठकीत दिल्या.

कायमस्वरूपी उपाययोजना
जांभूळवाडी ते वारजे रिंग रोड आणि जांभूळवाडी ते रावेत उन्नत मार्ग हा नवले पूल परिसरातील अपघात कमी करण्यासाठीचा कायमस्वरूपी उपाय आहे.पीएमआरडीए’च्या वतीने जांभूळवाडीपासून ते वारजेपर्यंत रिंगरोडचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्याचे काम सुरू असून त्या कामाला गती द्यावी. उन्नत कॉरिडॉरचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) पूर्ण झाला आहेे. हा अहवाल लवकरात लवकर मंत्रीमंडळासमोर मान्यतेसाठी सादर केला जाईल, असे मोहोऴ म्हणाले.

जबाबदारी निश्चित
या बैठकीत सर्व यंत्रणांवर आवश्यक जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. त्याचबरोबर या बैठकीच्या इतिवृत्तानुसार कोणत्या यंत्रणेने काय काम केले याचा आढावा डिसेंबर महिन्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात घेतला जाईल, असे मोहोळ यांनी स्पष्ट केले.

या उपाययोजना होणार
स्पीड गन्सची संख्या तीनऐवजी सहापर्यंत वाढवावी.
– वाहनांची वेगमर्यादा प्रतितास ६० ऐवजी ३० किमी करावी.
– रस्त्यावरील रिफ्लेक्टर्सची संख्या वाढवावी.
– पीएमपीने अधिकृत बसथांबे उभारावेत.
– सर्व यंत्रणांनी आपापल्या हद्दीतील सेवारस्त्यांवरील अतिक्रमणे त्वरित काढून घ्यावीत.

तर जड वाहनांवर कारवाई
प्रादेशिक परिवहन विभागामार्फत खेड शिवापूर टोलनाक्यावर जड व अवजड वाहनांतील अतिभार (ओव्हरलोड), ब्रेक तसेच इतर तांत्रिक बाबींची तपासणी करण्यात येईल. जड व अवजड वाहनांनी नियमांचे उल्लंघन केल्यास पुढच्या टोलनाक्यावर दंड करण्याची कार्यवाही करण्यात येईल.