December 2, 2025

यंदाची ३९ वी पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन ७ डिसेंबरला; पूर्ण मॅरेथॉनच्या मार्गात मात्र बदल

पुणे, १८ नोव्हेंबर २०२५: पुण्याची ओळख जगभर पोहोचवणारी आणि देशातील सर्वात जुनी अशी पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन यंदा ३९ व्या वर्षात प्रवेश करत आहे. येत्या ७ डिसेंबर २०२५ रोजी रविवारी ही प्रतिष्ठित मॅरेथॉन पार पडणार असून, यंदा पुरुष व महिला पूर्ण मॅरेथॉनच्या मार्गात बदल करण्यात आला असल्याची माहिती संस्थेचे ट्रस्टी अभय छाजेड यांनी पत्रकार परिषदेत दिली.

मॅरेथॉनची वेळ व विविध गटांच्या स्पर्धा
सणस मैदानाजवळील हॉटेल कल्पना-विश्व चौकातून पहाटे ३:०० वाजता ४२.१९५ किमीची पूर्ण मॅरेथॉन सुरू होईल.
आयोजनाचा तपशील असा:
३:३० वाजता : पुरुष-महिला अर्ध मॅरेथॉन (२१.०९५ किमी)
६:३० वाजता : १० किमी ओपन रन
७:०० वाजता : ५ किमी रन
७:१५ वाजता : व्हीलचेअर ३ किमी स्पर्धा
१५ हजारांहून अधिक धावपटूंचा सहभाग अपेक्षित

या वर्षी १५,000 पेक्षा जास्त स्पर्धक सहभागी होण्याची शक्यता आहे. प्रवेशाची अंतिम तारीख २८ नोव्हेंबर निश्चित करण्यात आली आहे.
विजेत्यांसाठी पुणे महापालिकेकडून ३५ लाख रुपयांची बक्षिसे ठेवण्यात आली असून, भारतीय गटातील पहिल्या तीन विजेत्यांसाठी विशेष पारितोषिके देण्यात येणार आहेत.

यंदाच्या स्पर्धेत इथियोपिया, केनिया, टांझानिया, मॉरीशस अशा देशांतील ७० हून अधिक धावपटूंनी नावे नोंदवली आहेत. तसेच सेनादल, रेल्वे, पोलीस, एएसआय, बॉम्बे सॅपर्स, एसआरपीएफ, एनडीए यांतील धावपटूही सहभागी होणार आहेत. लडाख–कारगिल येथील विजेते धावपटूही या स्पर्धेत उतरणार आहेत.

छाजेड यांनी सांगितले की, गौरव पदके यावर्षीही पर्यावरणपूरक, बांबूपासून तयार केलेली असतील.

पूर्ण मॅरेथॉनसाठी नव्या मार्गाचा तपशील

४२.१९५ किमीच्या मॅरेथॉनचा मार्ग यंदा बदलण्यात आला आहे. पूर्ण मॅरेथॉन दोन टप्प्यांत धावली जाईल.

पहिला टप्पा — २१.०९५ किमी

हॉटेल कल्पना-विश्व चौक → सणस चौक → बाजीराव रस्ता → नगरकर तालीम → लक्ष्मी रोड → कुलकर्णी पेट्रोल पंप → शनिवार वाडा → शिवाजी पूल → मनपा भवन → मॉडर्न कॅफे → JM रोड → डेक्कन जिमखाना → संभाजी पार्क → खंडूजी बाबा चौक → कर्वे रस्ता → कर्वे पुतळा → इराणी कॅफे → करिश्मा बिल्डिंग → म्हात्रे पूल → मेहेंदळे गॅरेज → डीपी रोड → जोशी किचन → पंडित फार्म → राजाराम पूल → सिंहगड रोड → नवशा मारुती → पु. ल. देशपांडे उद्यान → पानमळा → दांडेकर पूल → पर्वती पायथा → महालक्ष्मी चौक → सारसबाग → सणस पुतळा → हॉटेल कल्पना-विश्व (पहिला टप्पा समाप्त)

दुसरा टप्पा — उर्वरित २१.०९५ किमी

सणस पुतळा → महालक्ष्मी चौक → स्वातंत्र्यवीर सावरकर पुतळा → खंडोबा मंदिर → दांडेकर चौक → सिंहगड रोड → गणेश मळा → राजाराम पूल → संतोष हॉल → गोयल गंगा चौक → धायरी पूल → नांदेड सिटी मुख्य प्रवेशद्वार → डिस्टेंशन सेंटर (गोल फेरी) → परत त्याच मार्गाने सणस मैदानात मॅरेथॉन समाप्त.

इतर स्पर्धांचे मार्ग

अर्ध मॅरेथॉन (२१ किमी) : पूर्ण मॅरेथॉनच्या पहिल्या टप्प्याचा संपूर्ण मार्ग

१० किमी : हॉटेल कल्पना-विश्व → महालक्ष्मी चौक → संतोष हॉल → परत सणस मैदान

५ किमी : कल्पना-विश्व → गणेश मळा चौक → परत सणस मैदान

व्हीलचेअर ३ किमी : दांडेकर पूल चौक फेरी करून परत सणस मैदान