December 3, 2025

राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई; ४० लाखांहून अधिक रुपयांचा मुद्देमाल जप्त तर ८ आरोपी अटकेत

पुणे, २० नोव्हेंबर २०२५: राज्य उत्पादन शुल्क विभागाने पुण्यातील धायरी आणि दौंड परिसरात अवैध मद्यनिर्मिती, वाहतूक व विक्रीविरोधात मोठी मोहीम राबवून तब्बल ४० लाख ५ हजार ७२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून एकूण ८ आरोपींना अटक करण्यात आली आहे.

धायरीत गोव्यातून आणलेले मद्य जप्त

निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क (डी विभाग) यांच्या पथकाने धायरी फाटा, सिंहगड रोड पोलीस स्टेशन हद्दीत टोयोटा इनोव्हा क्रिस्टा (एमएच १२ व्हीएल ०९५५) या संशयित वाहनाची तपासणी केली. वाहनातून गोव्यात निर्मित मोठ्या प्रमाणात दारू सापडली. जप्त केलेल्या मॅकडॉवेल नं.१, रॉयल स्टॅग आणि इंपिरियल ब्ल्यू या ब्रँडच्या ७२० बाटल्यांची किंमत २४ लाख ४ हजार १६० रुपये आहे.

घटनास्थळी अमर पुंडलिक बोडरे (रा. सातारा) आणि चेतन मधुकर बाटे (रा. नऱ्हे, पुणे) यांना अटक करण्यात आली. पुढील तपासात चेतन बाटे यांच्या फ्लॅटवर छापा टाकण्यात आला. येथे विविध ब्रँड्सच्या ४८० हून अधिक बाटल्या, ६०० बनावट बुचे, १९२ रिकाम्या बाटल्या व मोबाईल असा १ लाख १८ हजार ५६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

तसेच त्याच सोसायटीत राहणारे तुषार सुभाष काळाणे (रा. पुरंदर) यांच्या घरातून एड्रिएल क्लासिक व्हिस्कीच्या २८४ बाटल्या, ७५० बनावट बुचे व मोबाईल असा ४ लाख ६ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त झाला.

या संपूर्ण कारवाईत एकूण ५ आरोपी अटकेत असून २९ लाख ९२ हजार २२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

दौंडमधील कारवाईत १० लाखांचा मुद्देमाल हस्तगत

दौंड येथील स्वामी चिंचोली परिसरातही राज्य उत्पादन शुल्क विभागाने धाड टाकली. येथे इंपिरियल ब्ल्यूच्या ४८० बाटल्या, रॉयल स्टॅगच्या २४० बाटल्या व मोबाईल असा ८ लाख ८५ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त झाला आणि वैभव साळुंखे यांना अटक करण्यात आली.

त्यांच्या घरातूनही विविध ब्रँड्सच्या ४३२ बाटल्या व १३०० बनावट लेबल्स असा १ लाख २७ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाईत ३ आरोपींना अटक झाली.

एकूण १० लाख १२ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल दौंड विभागाने जप्त केला.

कारवाई कायम राहणार : उत्पादन शुल्क विभाग

या घटनांची पुढील तपासणी निरीक्षक सचिन श्रीवास्तव (डी विभाग, पुणे) आणि दुय्यम निरीक्षक प्रदीप झुंजरुक (दौंड विभाग) करत आहेत.

अवैध मद्यनिर्मिती व विक्रीविरोधातील कारवाई पुढेही अधिक कठोरपणे सुरू राहील, असे अधीक्षक अतुल कानडे यांनी स्पष्ट केले. नागरिकांनी संशयास्पद माहिती मिळाल्यास टोल फ्री क्रमांक – 1800 233 9999 किंवा 020–26058633 वर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.