December 3, 2025

रस्त्यावर सापडलेली दहा लाखांची बॅग प्रामाणिकपणे परत; कचरा वेचक अंजू माने यांच्या प्रामाणिकतेला नागरिकांचा सलाम

पुणे, २१ नोव्हेंबर २०२५ : सदाशिव पेठ परिसरात दारोदार कचरा संकलनाचे काम करणाऱ्या ‘स्वच्छ’ संस्थेच्या कचरा वेचक अंजू माने यांनी प्रामाणिकतेचे उत्तम उदाहरण घालत दहा लाख रुपयांची रोख रकमेची बॅग मालकाला सुखरूप परत केली. त्यांच्या या प्रामाणिक वर्तनाचे परिसरातील नागरिकांनी कौतुक करत सत्कार केला.

२० नोव्हेंबर रोजी सकाळी नेहमीप्रमाणे ७ वाजल्यापासून अंजू माने कचरा गोळा करण्याच्या कामावर होत्या. अंदाजे ८ ते ९ च्या सुमारास त्यांना रस्त्याच्या कडेला एक बॅग पडलेली दिसली. यापूर्वीही औषधांच्या बॅग सापडण्याचा अनुभव असल्याने त्यांनी ती बॅग उचलून फीडर पॉइंटवर सुरक्षित ठेवली. मात्र बॅग उघडल्यावर त्यात औषधांसह मोठी रोख रक्कम — तब्बल दहा लाख रुपये — असल्याचे त्यांच्या लक्षात आले.

गेल्या २० वर्षांपासून सदाशिव पेठेत काम करत असल्याने परिसरातील नागरिकांशी जवळचे नाते असलेल्या अंजू यांनी ओळखीच्या लोकांच्या मदतीने बॅगच्या मालकाचा शोध सुरू केला. त्या वेळेतच एक नागरिक अतिशय चिंतेत काहीतरी शोधत असल्याचे अंजू यांच्या लक्षात आले. त्यांनी त्या नागरिकाला शांत केले, पाणी दिले आणि पडताळणीनंतर ती बॅग त्यांचीच असल्याचे निश्चित करून रक्कमेसह पूर्णपणे परत केली.

त्या नागरिकाने तसेच परिसरातील रहिवाशांनी अंजू माने यांच्या प्रामाणिकतेचा गौरव करत त्यांना साडी आणि रोख रकमेने सन्मानित केले.

अंजू माने यांच्या या कृतीमुळे नागरिक व कचरा वेचक यांच्यातील मागील २० वर्षांत तयार झालेल्या विश्वासाच्या नात्याची पुन्हा एकदा जाणीव झाली. ‘स्वच्छ’च्या ४००० कचरा वेचकांमार्फत ४० लाख पुणेकरांना दिली जाणारी दैनंदिन स्वच्छता सेवा अशाच प्रामाणिकपणामुळे अधिक परिणामकारक होत आहे.