December 3, 2025

जंगली महाराज रस्त्यावर महापालिकेचा ‘सर्जिकल स्ट्राईक’, कारवाईसाठी अतिरिक्त आयुक्तच मैदानात

पुणे, २१ नोव्हेंबर २०२५: शहरभर अतिक्रमण कारवाई होत असताना आता शहराच्या मध्यवर्ती भागातील जंगली महाराज रस्ता आणि फर्गुसन महाविद्यालय रस्त्यावरील अतिक्रमणांवर अखेर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचा बुलडोझर फिरला आहे. विशेष म्हणजे, एरवी अतिक्रमण विभागाकडून या रस्त्यांवर दुपारी कारवाई केल्यानंतर पथक पुढे गेल्यावर पुन्हा अतिक्रमणे केली जातात. मात्र, यावेळी प्रशासनाने जाणीवपूर्वक संध्याकाळची वेळ निवडल्याने व्यावसायिकांची चांगलीच धावपळ उडाली. या कारवाईत ५० हून अधिक दुकाने, हॉटेल तसेच पथारी व्यावसायिकांवर कारवाई करण्यात आली. विशेष म्हणजे, या कारवाईवेळी स्वतः महापालिका आयुक्त पृथ्वीराज बी. पी. रस्त्यावर उतरले होते.

महापालिकेकडून जंगली महाराज रस्ता आणि फर्गुसन रस्त्यावर अर्बन स्ट्रीट प्रकल्पांतर्गत पदपथ तयार करण्यात आले आहेत. मात्र, या पदपथांवरच अनेक व्यावसायिकांनी अतिक्रमणे केली आहेत. तसेच साइड मार्जिन आणि फ्रंट मार्जिनमध्ये शेड उभारून व्यवसाय सुरू केला आहे. त्यामुळे अनेकदा या पदपथांवरून चालणे कठीण झाले आहे. याबाबत नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर तक्रारी करण्यात आल्या होत्या. महापालिकेकडून कारवाई हाती घेतली की व्यावसायिकांकडून अतिक्रमणे काढून घेतली जात होती. मात्र, यावेळी कोणतीही पूर्वकल्पना न देता महापालिकेने थेट कारवाई केली. त्यामुळे व्यावसायिकांना स्वतःची साधनसामग्री काढण्यास वेळच मिळाला नाही.

कारवाईदरम्यान जेसीबीने ओनिंग शेड काढण्यात आले तसेच अनधिकृत बांधकामे पाडण्यात आली. याशिवाय, रस्त्यावर ठेवलेले फ्रीज, स्टॉल, स्टॅन्डी, टेबल, खुर्च्या प्रशासनाने जप्त केल्या. काही व्यावसायिकांनी गोंधळ घालत कारवाईस विरोध करण्याचा प्रयत्न केला. मात्र, महापालिकेने आधीच मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात केल्याने कारवाईला मोठा विरोध झाला नाही. अतिक्रमण विभागाचे उपायुक्त सोमनाथ बनकर, उपायुक्त रमेश शेलार यांच्यासह क्षेत्रीय कार्यालयाचे अधिकारी उपस्थित होते.

खबरीही ठरले फेल
महापालिकेच्या अतिक्रमण विभागातील काही कर्मचारी या रस्त्यांवरील व्यावसायिकांसाठी ‘खबऱ्या’चे काम करतात. अतिक्रमण कारवाईची माहिती मिळताच ते या रस्त्यांवरील व्यावसायिकांना तसेच पथारी व्यवसायिकांना पूर्वसूचना देतात. मात्र, शुक्रवारी ही कारवाई अचानक करण्यात आली. त्यापूर्वीच महापालिकेची कारवाई पथके मुख्य इमारतीच्या परिसरात बोलावण्यात आली होती. कुठे कारवाई करायची याची कोणतीही कल्पना त्यांना देण्यात आली नव्हती. त्यामुळे या खबऱ्यांनाही माहिती मिळाली नाही आणि त्यांनी व्यावसायिकांना काहीच कळवू न शकल्याचे या कारवाईतून स्पष्ट झाले