पुणे, २२ नोव्हेंबर २०२५: खेड शिवापुर टोल नाक्यावर रस्ता सुरक्षा मार्गदर्शन व वाहनचालकांची डोळे तपासणी शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न झाले. या शिबिराचे अध्यक्षस्थान वाहतूक विभागाचे पोलिस निरीक्षक राजेंद्र कुंभार यांनी भूषविले. कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक मोटार वाहन निरीक्षक वसंत कलंबरकर यांनी उपस्थित अधिकारी, डॉक्टर, शिक्षकवर्ग व वाहनचालक बांधवांचे स्वागत करत रस्ता सुरक्षेचे वाढते महत्त्व स्पष्ट केले.
त्यांनी वेगमर्यादा न पाळणे, हेल्मेट व सीटबेल्टचा वापर न करणे, वाहन चालवताना मोबाईलचा वापर, ओव्हरटेकची घाई आणि थकव्यामुळे होणारे अपघात याकडे लक्ष वेधून “सुरक्षा ही सवय नसून जबाबदारी आहे” असा संदेश दिला. सिग्नलचे पालन, वाहनाचे नियमित देखभाल, तसेच थकवा आल्यास वाहन थांबवणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
वाहनचालकांच्या दृष्टीक्षमता तपासणीचे महत्त्व सांगताना त्यांनी दूरदृष्टी, रंगदृष्टी आणि रात्रीची दृष्टी नीट असल्यास अपघात टाळता येतात, असे नमूद केले. अनेक चालकांना दृष्टीदोष असल्याचे त्यांना न कळल्याने अशा शिबिरांची गरज अधिक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या शिबिरात डॉ. दूधभाते नेत्रालय आणि रिटर्न केंद्र पुणे यांच्या डॉक्टरांनी ११० वाहनचालकांची डोळे तपासणी करून मोलाचे सहकार्य दिले.
शिबिराचा समारोप मोटार वाहन निरीक्षक कृष्णांत बामणीकर यांच्या हस्ते झाला. त्यांनी आयोजनातील सर्व अधिकारी, कर्मचारी, डॉक्टर आणि उपस्थित नागरिकांचे आभार मानत रस्ता सुरक्षा नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले. तसेच शासनाच्या ‘रहावीर’ अपघात मदत योजनेची सविस्तर माहितीही दिली.
यावेळी मोटार वाहन निरीक्षक अमोल दराडे आणि अर्जुन खिंडारे यांनी सर्व उपस्थितांकडून रस्ता सुरक्षा प्रतिज्ञा देऊन घेतली.
कार्यक्रमाला माधवी सोनार, अनुजा काळमेघ, सरपंच स्वप्निल जगताप, माजी सरपंच स्वप्निल कोंडे, सुनील धुमाळ (टोल नाका व्यवस्थापक), डॉ. पल्लवी देशमुख, अश्विनी जाधव, किशन जोगदंड आदी मान्यवर उपस्थित होते.

More Stories
सूर महती महोत्सवात रसिकांनी अनुभविली गायन, वादन आणि नृत्यप्रस्तुतीची अनुभूती
नगरपरिषद व नगरपचांयतीच्या सार्वत्रिक निवडणूकीकरिता २ डिसेंबर रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी
Pune: शहरात ३० नोव्हेंबर रोजी ‘नदी महोत्सव’ साजरा होणार