December 2, 2025

पुणे शहरात मद्यपी चालकांविरुद्ध वाहतूक विभागाची मोठी कारवाई; तीन दिवसांत १७० हून अधिक वाहनचालकांवर गुन्हे

पुणे, २४ नोव्हेंबर २०२५: मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्या चालकांवर शिक्कामोर्तब कारवाई करण्यासाठी पुणे शहर वाहतूक विभागाने २१ ते २३ नोव्हेंबर या तीन दिवसांच्या कालावधीत विशेष मोहीम राबविली. शहरातील विविध ठिकाणी ३० नाकाबंदी पॉईंट्स उभारून कडक तपासणी करण्यात आली.

या मोहिमेदरम्यान मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवित असल्याचे निदर्शनास आल्यानंतर १७८ वाहनचालकांवर मोटार वाहन कायद्यानुसार दंडात्मक आणि पुढील कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.

या पार्श्वभूमीवर पोलीस उपायुक्त (वाहतूक) हिम्मत जाधव म्हणाले, “मद्यप्राशन करून वाहन चालविणे हा अत्यंत गंभीर गुन्हा असून यामुळे अपघातांचा धोका अनेक पटींनी वाढतो. नागरिकांनी वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करावे आणि स्वतःचा तसेच इतरांचा जीव सुरक्षित ठेवावा.”

वाहतूक विभागाकडून पुढील काळात अशा तपासण्या अधिक तीव्र करण्याचे संकेत देखील यावेळी देण्यात आले आहेत.