December 7, 2025

Pune: मुंढवा जमीन घोटाळ्यात शीतल तेजवानीला अटक; पार्थ पवारांवर कारवाई नाहीच

पुणे, ३ डिसेंबर २०२५: पुण्यातील बहुचर्चित मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणात मुख्य आरोपी मानल्या जाणाऱ्या शीतल तेजवानीला अखेर अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात तेजवानीची दोन वेळा चौकशी झाल्यानंतर तिचा थेट सहभाग असल्याचे आर्थिक गुन्हे शाखेला स्पष्ट झाल्यावर कारवाई करण्यात आली.

मुंढवा येथील सर्व्हे नंबर ८८ मधील ४३ एकर सरकारी जमीन खरेदी-विक्री करून व्यवहार करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप आहे. या प्रकरणात अमेिडिया कंपनीचे भागीदार दिग्विजय पाटील आणि जमीन संबंधित पॉवर ऑफ अ‍ॅटर्नीधारक शीतल तेजवानी यांच्यावर गुन्हा दाखल आहे.

या व्यवहाराशी संबंधितपणे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्या कंपनीचा संबंध अधोरेखित झाला असला तरी, पार्थ पवार यांच्यावर कोणतीही कारवाई किंवा तपासाची प्रक्रिया अद्याप सुरू झालेली नाही. यामुळे प्रकरणाचा फोकस फक्त तेजवानीवर केंद्रीत होत असल्याने “शीतल तेजवानीला बळीचा बकरा बनवले जात आहे का?” असा प्रश्न उपस्थित होत आहे.

आर्थिक गुन्हे शाखेचे उपायुक्त विवेक मासाळ यांनी सांगितले की, ३ डिसेंबर रोजी खडक पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यानुसार तेजवानीला वारंवार चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. चौकशीत सहभाग स्पष्ट झाल्यानंतरच अटक झाली, असे त्यांनी स्पष्ट केले.

सरकारी जमीन असताना ती खरेदी-विक्री करून व्यवहार फायद्याचा करण्याचा प्रयत्न, त्यात खाजगी भागीदारांचे हितसंबंध आणि राजकीय नातेसंबंध यामुळे हे प्रकरण अधिकच गाजत असून तपासाची दिशा कोणाकडे वळते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.