December 7, 2025

खड्डेमुक्ती मोहिमेला एक महिना; महापालिकेने २,९८९ खड्डे बुजवले, १८ हेक्टर रस्त्यांची दुरुस्ती

पुणे, ३ डिसेंबर २०२५: शहरातील रस्त्यांवरील खड्डेमुक्ती मोहिमेला एक महिना पूर्ण झाला असून, या कालावधीत मोठ्या प्रमाणावर रस्ते दुरुस्तीची कामे पूर्ण करण्यात आल्याची माहिती पुणे महापालिकेच्या पथ विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांनी दिली. खड्डेमुक्तीसाठी महापालिकेने सर्व विभागांतील ठेकेदार, मुख्य खात्यातील अभियंते, उपअभियंता, कनिष्ठ अभियंते यांची स्वतंत्र टीम तयार करून युद्धपातळीवर काम सुरू केले होते. त्यानुसार गेल्या ३० दिवसांत महापालिकेने रस्त्यांवरील तातडीच्या दुरुस्तीचे काम सर्वाधिक वेगाने केल्याचा दावा पथविभागाने केला आहे.

रस्त्यांवरील खड्डे हा शहरातील नागरिकांसाठी मोठा प्रश्न आहे. एक महिना पूर्ण क्षमतेने काम करून मोठ्या प्रमाणात रस्ते सुधारले आहेत. मात्र ही प्रक्रिया इथेच थांबणार नाही. पुढील काळातही काम सातत्याने सुरू राहील, असा आमचा मानस आहे. महापालिकेच्या या मोहिमेमुळे शहरातील अनेक महत्त्वाच्या मार्गांवरील खड्ड्यांची समस्या मोठ्या प्रमाणात कमी झाली असून नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे – अनिरुध्द पावसकर, प्रमुख, पथ विभाग, पुणे महापालिका.

पावसकर यांच्या माहितीनुसार, शहरातील विविध रस्त्यांवर एकूण २,९८९ वेगवेगळे (आयसोलेटेड) खड्डे बुजवण्यात आले. हे असे खड्डे होते की, रस्ता एकूण चांगल्या स्थितीत असूनही काही ठिकाणी खोल किंवा धोकादायक खड्डे निर्माण झाले होते. अशा ठिकाणांना प्राधान्य देत तत्काळ दुरुस्ती करण्यात आली. मात्र काही रस्त्यांवर सलगपणे मोठ्या प्रमाणात खड्डे असल्याने केवळ खड्डे बुजवून समाधान होत नव्हते. अशा ठिकाणी संपूर्ण रस्त्याचे मिलिंग करून नव्याने डांबरीकरण करण्याची आवश्यकता असल्याने त्या मार्गानेही काम करण्यात आले.

कामाचा वेग आणि ताण लक्षात घेता, महापालिकेने गेल्या महिन्यात एकूण १ लाख ८८ हजार ९४८ चौरस मीटर म्हणजे जवळपास १ लाख ८९ हजार चौरस मीटर रस्त्यांवर दुरुस्तीची कामे केली. हे क्षेत्रफळ अंदाजे १८ हेक्टर इतके आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर काम इतक्या कमी वेळेत यापूर्वी कधीच झाले नव्हते, असे पावसकर यांनी स्पष्ट केले. महापालिकेकडे प्रत्येक खड्ड्याचे ‘बिफोर-आफ्टर’ फोटो, कामाचा तपशील, मोजमाप यासह संपूर्ण नोंद उपलब्ध आहे.

रोड मित्र ॲपच्या माध्यमातून नागरिकांकडून मिळालेल्या ३९०४ तक्रारींपैकी केवळ ३४ तक्रारी प्रलंबित राहिल्या असून बाकी सर्व तक्रारींवर कारवाई झाल्याचे पथविभागाने सांगितले. स्थानिक नागरिकांशी संवाद साधून ॲपवर नोंद न झालेल्या खड्ड्यांचीही दुरुस्ती करण्यात आली.

या संपूर्ण मोहिमेस साधारण १५ कोटी रुपये खर्च आल्याचेही पावसकर यांनी सांगितले. महापालिकेच्या सर्व क्षेत्रीय कार्यालयांना सरासरी प्रत्येकी एक कोटी रुपये या कामांसाठी वितरित करण्यात आले. त्याशिवाय, सुमारे १८०० ठिकाणी रस्ते खरवडून (मिलिंग) नव्याने थर टाकण्याचे काम करण्यात आले.

याचदरम्यान, महापालिकेने खड्डेमुक्तीच्या कामात निष्काळजीपणा आढळलेल्या काही ठेकेदारांवर कारवाईही केली असून महाप्रीत या संस्थेसह पोलिसांच्या ठेकेदारालाही ‘स्टॉप वर्क’ आदेश देण्यात आले आहेत.