December 21, 2025

महाराष्ट्र क्रिकेट संघटना पुरुष कॉर्पोरेट चषक स्पर्धा २०२५–२६ ः पुनीत बालन क्रिकेट अकॅडमीचा दणदणीत विजय

पुणे, १७ डिसेंबर २०२५ : महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या वतीने आयोजित पुरुष कॉर्पोरेट चषक स्पर्धा २०२५–२६ अंतर्गत झालेल्या सामन्यात पुनीत बालन क्रिकेट अकॅडमी संघाने भक्कम फलंदाजी व शिस्तबद्ध गोलंदाजीच्या जोरावर कपील सन्स संघाचा ८९ धावांनी पराभव केला.

स्वारगेट येथील नेहरू क्रीडांगणावर पार पडलेल्या या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या पुनीत बालन क्रिकेट अकॅडमीने निर्धारित ५० षटकांत ७ गडी बाद ४०४ धावा करत मोठी धावसंख्या उभारली. संघाच्या या कामगिरीत पवन शहा आणि सचिन धस यांच्या शतकी खेळी निर्णायक ठरल्या.

सलामीवीर हर्ष मोगवीरा (३०) आणि पवन शहा यांनी संघाला आक्रमक सुरुवात करून दिली. पहिल्या गड्यासाठी ५५ धावांची भागीदारी झाली. त्यानंतर पवन शहा व सचिन धस यांनी दुसऱ्या गड्यासाठी १५१ धावांची भक्कम भागीदारी करत प्रतिस्पर्धी गोलंदाजांवर वर्चस्व प्रस्थापित केले.
पवन शहा याने १०१ चेंडूंत ११ चौकारांसह १०१ धावा करत शतक पूर्ण केले, तर सचिन धस याने ९५ चेंडूंत ९ चौकार व २ षटकारांच्या साहाय्याने १०१ धावांची शतकी खेळी साकारली. डावाच्या अखेरीस सिद्धार्थ म्हात्रे याने आक्रमक फलंदाजी करत ३४ चेंडूंत ५० धावा केल्या. त्यामुळे संघाने ४०० धावांचा टप्पा सहज पार केला.

४०५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना कपील सन्स संघाने झुंज देण्याचा प्रयत्न केला. सिद्धेश वीर (३८ चेंडूंत ५१ धावा) तसेच नीरज जोशी आणि अनुराग कवाडे यांनी प्रत्येकी ५० धावांची अर्धशतकी खेळी करत संघाला सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र आवश्यक धावगतीचा ताण आणि पुनीत बालन क्रिकेट अकॅडमीच्या अचूक गोलंदाजीसमोर कपील सन्स संघाचा डाव ४४.५ षटकांत ३१५ धावांवर संपुष्टात आला.

या सामन्यात अनुराग कवाडे यांनी आपल्या क्रिकेट कारकिर्दीतील १,५०० धावांचा महत्त्वाचा टप्पा पूर्ण केला. सामन्याचे पंच म्हणून अक्षय पवार, महेश सावंत आणि नवीन माने यांनी काम पाहिले.

याबाबत पुनीत बालन क्रिकेट अकॅडमीचे पुनीत बालन म्हणाले, “महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या पुरुष कॉर्पोरेट चषक स्पर्धेत पुनीत बालन क्रिकेट अकॅडमीच्या दणदणीत विजयाने मनःपूर्वक आनंद झाला आहे. संघातील सर्व खेळाडूंनी सांघिक खेळाचे उत्कृष्ट दर्शन घडवले. पुढील काळातही संघाने असेच सातत्य राखून विविध स्पर्धांमध्ये उज्ज्वल कामगिरी करावी, अशी अपेक्षा आहे. संपूर्ण संघाचे हार्दिक अभिनंदन.”