December 19, 2025

‘मनसे’शी युती म्हणजे उबाठा गटाचा अस्तित्व वाचवण्याचा शेवटचा प्रयत्न – नवनाथ बन

पुणे, 17 डिसेंबर २०२५ : उबाठा गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमधील संभाव्य युती ही उबाठा गटाच्या अस्तित्व वाचवण्याचा शेवटचा प्रयत्न असून, आगामी महानगरपालिका निवडणुकांमध्ये सूज्ञ मतदार या दोन्ही पक्षांचा टप्प्याटप्प्याने योग्य निर्णय घेतील, असा विश्वास भारतीय जनता पार्टीचे माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांनी व्यक्त केला. ते बुधवारी भाजपा प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

खा. संजय राऊत यांनी उबाठा गट व मनसे यांच्यातील जागावाटप अंतिम टप्प्यात असल्याचे केलेले विधान हास्यास्पद असल्याची टीका करत, ज्या मनसेवर जहरी टीका व शिवीगाळ करण्यात आली, त्याच मनसेच्या दारात आज उद्धव ठाकरे यांना जावे लागत आहे, हा नियतीचा खेळ आहे, असा हल्लाबोल नवनाथ बन यांनी केला.

मुंबई कोणाची खासगी जहागीर नाही

मुंबई ही कोणत्याही एका पक्षाची किंवा व्यक्तीची खासगी जहागीर नसून ती सर्वसामान्य मुंबईकरांची आहे. उबाठा गटाने मुंबईला खासगी मालमत्तेसारखे ओरबाडले असून ‘मुंबई आमचीच’ असे म्हणताना त्यांना लाज वाटायला हवी, असा प्रहारही त्यांनी केला.
“घर हे केवळ चार भिंतींवर नव्हे तर विचारांवर उभे असते. वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना विचारांवर उभी केली होती. मात्र उबाठा गटाने सत्तेसाठी ते विचार पायदळी तुडवत पक्ष काँग्रेसच्या दावणीला बांधला,” अशी टीकाही त्यांनी केली.

उबाठा सरकार ‘टेस्ट ट्यूब बेबी’

महायुती सरकारवर ‘टेस्ट ट्यूब बेबी’ अशी टीका करणाऱ्या संजय राऊतांना प्रत्युत्तर देताना नवनाथ बन म्हणाले की, महायुती सरकार हे जनतेच्या आशीर्वादातून, दोन तृतीयांश बहुमताने निवडून आलेले सरकार आहे.
“घरातून फेसबुक लाइव्हवर चालणारे उबाठा सरकार हेच खरे टेस्ट ट्यूब बेबी होते. ९० जागा लढवून केवळ २० जागा जिंकणाऱ्यांनी खरे बेबी कोण हे आधी ओळखावे,” असा टोमणाही त्यांनी लगावला.

शिवतीर्थावर उबाठा गटाचा अधिकार नाही

शिवतीर्थ हा सार्वजनिक वारसा असून, येथे अटल बिहारी वाजपेयी, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या ऐतिहासिक सभा झाल्या आहेत.
“ज्या दिवशी खुर्चीसाठी बाळासाहेबांचे विचार सोडून उबाठा गटाने काँग्रेससोबत हातमिळवणी केली, त्याच दिवशी त्यांनी शिवतीर्थावरचा नैतिक अधिकारही गमावला,” अशी सणसणीत टीका नवनाथ बन यांनी केली.

निवडणूक आयोगावर टीका म्हणजे लोकशाहीचा अपमान

निवडणूक आयोगाबद्दल अपशब्द वापरणे म्हणजे लोकशाहीचा अपमान असल्याचे सांगत, २०१९ मध्ये भाजपासोबत युती करून सत्तेसाठी पाठीत खंजीर खुपसणारा उबाठा गटच ‘हरामखोर’ या शब्दास पात्र असल्याचा आरोप त्यांनी केला.
“सत्तेसाठी काँग्रेसकडे गेले तेव्हा निवडणूक आयोग योग्य होता का?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

काँग्रेसमधील गळतीस राहुल गांधी व सपकाळ जबाबदार

राहुल गांधी आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाबाबत काँग्रेसमध्ये तीव्र नाराजी असून, त्यामुळे काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश करण्याची लाट सुरू असल्याचा दावा नवनाथ बन यांनी केला.
भाजपामध्ये येणाऱ्या प्रत्येकाचे नेहमीच स्वागत करण्यात येते, असेही त्यांनी स्पष्ट केले.