December 19, 2025

‘एमझेड’ नव्या मालिकेतील आकर्षक वाहन क्रमांकांसाठी पिंपरी-चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयात अर्ज प्रक्रिया जाहीर

पिंपरी-चिंचवड, १७ डिसेंबर २०२५ : चारचाकी वाहनांना आकर्षक व पसंतीचे नोंदणी क्रमांक मिळावेत, यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालय, पिंपरी-चिंचवड येथे ‘एमझेड’ ही नवीन नोंदणी मालिका लवकरच सुरू करण्यात येणार आहे. या मालिकेतील निवडक व आकर्षक नोंदणी क्रमांक आगाऊ राखीव ठेवण्यासाठीची अर्ज प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे.

नवीन ‘एमझेड’ मालिकेतील पसंतीचे नोंदणी क्रमांक राखीव ठेवण्यासाठी इच्छुक वाहनधारकांनी विहित शुल्क भरून दिनांक १८ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ११ ते दुपारी २.३० या वेळेत प्रादेशिक परिवहन कार्यालय, पिंपरी-चिंचवड (नवीन इमारत, मोशी) येथे ठरावीक नमुन्यात अर्ज सादर करावेत, असे कळविण्यात आले आहे.

अर्जासोबत धनादेश, पत्त्याचा पुरावा, आधार ओळखपत्र, ओळखपत्र व स्थायी खाते क्रमांक पत्राच्या साक्षांकित प्रती सादर करणे आवश्यक आहे. सदर धनादेश प्रादेशिक उपपरिवहन अधिकारी, पिंपरी-चिंचवड यांच्या नावे राष्ट्रीयीकृत अथवा अनुसूचित बँकेचा, पुणे येथील असणे बंधनकारक राहील. तसेच अर्जदाराची ओळख निश्चित करण्यासाठी केंद्रीय मोटार वाहन नियम, १९८९ आणि महाराष्ट्र मोटार वाहन नियम, १९८९ नुसार विहित पत्त्याच्या पुराव्याची साक्षांकित प्रत जोडणे आवश्यक आहे.

चारचाकी वाहनांच्या आकर्षक नोंदणी क्रमांकांची यादी दिनांक १९ डिसेंबर २०२५ रोजी कार्यालयाच्या सूचना फलकावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. यादीतील अर्जदारांना लिलाव प्रक्रियेसाठी अधिक रकमेचा धनादेश सादर करावयाचा असल्यास, त्यांनी १९ डिसेंबर रोजी दुपारी २.३० वाजेपर्यंत सीलबंद पाकिटात अर्ज कार्यालयात जमा करावा. त्याच दिवशी दुपारी ३.३० वाजता सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या कक्षात नोंदणी प्राधिकाऱ्यांच्या उपस्थितीत संबंधित अर्जदारांसमोर पाकिटे उघडण्यात येतील. विहित शुल्कापेक्षा सर्वाधिक रकमेचा धनादेश सादर करणाऱ्या पात्र अर्जदारास संबंधित पसंतीचा नोंदणी क्रमांक वितरित करण्यात येईल.

लिलाव प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर उर्वरित नोंदणी क्रमांक संकेतस्थळावरील पद्धतीने राखीव ठेवण्यासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. एकदा राखीव ठेवलेला नोंदणी क्रमांक बदलून देण्यात येणार नाही. नोंदणी क्रमांक राखीव ठेवल्याच्या दिनांकापासून १८० दिवसांच्या आत वाहन नोंदणीसाठी सादर न केल्यास तो क्रमांक आपोआप रद्द होऊन भरलेली रक्कम शासनजमा होईल. कोणत्याही परिस्थितीत आकर्षक नोंदणी क्रमांकासाठी भरलेली रक्कम परत मिळणार नाही अथवा समायोजित केली जाणार नाही. तसेच आकर्षक क्रमांकाच्या शुल्कात बदल झाल्यास त्या वेळी लागू असलेले शुल्क आकारले जाईल, असेही प्रादेशिक परिवहन कार्यालयाने स्पष्ट केले आहे.