December 24, 2025

डकारचे आव्हान संजय दुसऱ्यांदा पेलणार, नववर्षातील रॅलीसाठी सज्ज

पुणे, दिनांक 24 डिसेंबर 2025: सरत्या वर्षाच्या प्रारंभी डकार रॅली पूर्ण केलेला पहिला भारतीय ठरलेला पुण्याचा आंतरराष्ट्रीय रॅली ड्रायव्हर नववर्षात हे आव्हान कारकिर्दीत दुसऱ्यांदा पेलण्यासाठी सज्ज झाला आहे. जगातील सर्वाधिक खडतर आणि प्रदिर्घ रॅली यंदाही पूर्ण करण्याचे उद्दीष्ट त्याने ठेवले आहे.

सौदी अरेबियात ३ ते १६ जानेवारी दरम्यान डकार रॅली होईल. यात एकूण १३ फेऱ्या असतील. ंयेथील पत्रकार परिषदेत संजयने माहिती दिली. एअरपेस इंडस्ट्रीज लिमिटेडचे संचालक प्रकाश गौर, पुणे ऑटोमोटीव्ह रेसिंग असोसिएशनचे (पारा) सदस्य अनिरुद्ध देशपांडे, श्रीकांत आपटे यावेळी उपस्थित होते.

डकारमधील पदार्पणानंतर आलेले अनुभव, देशातील अनेक ठिकाणी विविध कार्यक्रमांना प्रमुख पाहुणा म्हणून उपस्थित राहताना रॅलीप्रेमींनी केलेली प्रशंसा, त्याचवेळी वर्षभर केलेली तयारी, तंदुरुस्तीचे प्रयत्न अशा विविध मुद्द्यांवर संजयने भाष्य केले.

संजय बगी गटात सहभागी होईल. फ्रान्सच्या काँपानी सहारीएन संघाकडून तो सहभागी होईल. फ्रान्सचा मॅक्झीम राऊद त्याचा नॅव्हीगेटर असेल. भारताचे राजय सियाल त्याचे व्यवस्थापक असतील. संजय मुंबईस्थित एअरपेस इंडस्ट्रीज संघाचेही प्रतिनिधित्व करेल. एअरपेस संघाने त्याचे प्रायोजक म्हणून पुढाकार घेतला आहे.

वर्षाच्या प्रारंभी संजयने डकार रॅलीत सनसनाटी पदार्पण केले. डकार रॅली पूर्ण केलेला (फिनिश) संजय पहिला भारतीय ठरला. त्याने क्लासिक गटात भाग घेतला होता. गटात दहावा आणि एकूण क्रमवारीत त्याने 94 स्पर्धकांत 18वा क्रमांक मिळविला. 14 दिवसांत तब्बल 12 स्टेज पूर्ण करीत त्याने कारकिर्दीतील सर्वोच्च टप्पा गाठला.

संजयने तीन दशकांहून जास्त काळ रेसिंगमध्ये कारकीर्द घडविली आहे. त्याने मायदेशात तसेच परदेशात 75 पेक्षा जास्त रॅली जिंकल्या आहेत. यात 2013 मध्ये त्याने आशिया पॅसिफीक रॅली मालिकेचे विजेतेपद मिळविले होते.

सौदी अरेबियात या मोसमात प्रचंड थंडी असते. वाळवंटात रात्री थंडी आणि दिवसा ऊन होते. मार्गावर वाळूचे छोटे डोंगर असल्याने कारवर सतत नियंत्रण ठेवावे लागते. यंदा एकूण १३ फेऱ्या असतील. पहिल्या टप्प्यात सहा, तर दुसऱ्या टप्प्यात सात फेऱ्या होतील. दोन मॅरेथॉन फेऱ्या डकारचे सर्वात मोठे आव्हान असते. यावेळी पहिल्या टप्प्यात चौथी व पाचवी फेरी मॅरेथॉन असेल. यात स्पर्धात्मक अंतर अनुक्रमे ४५१ आणि ३५६ असे एकूण ८७० किलोमीटर असेल. अलुला ते हैल असा मार्ग असेल. चौथ्या फेरीत मार्ग विस्तीर्ण असेल, पण वेड्यावाकड्या वळणांमुळे स्पर्धकांना कारचा वेग सतत कमी-जास्त करावा लागेल. पाचव्या फेरीत काही भाग खडकाळ असेल. त्यात स्पर्धकांना वळणा-वळणांमुळे दिशा सतत बदलावी लागेल.

सहाव्या फेरीनंतर रियाध शहरात एका दिवसाची विश्रांती असेल. दुसऱ्या टप्प्यात नववी व दहावी फेरी मॅरेथॉन असेल. त्यात वादी अद्् दावसीर ते बिशा असा मार्ग असेल. अनुक्रमे ४१८ आणि ३७१ असे एकूण ७८९ किलोमीटर अंतर असेल. या मॅरेथॉन फेऱ्या साधारण ४८ तास चालतात. त्यात स्पर्धकांच्या मानसिक आणि शारिरीक क्षमतेची कसोटी लागते.

डकारनंतर काय अनुभव आले, याविषयी संजयने सांगितले की, जगातील ही सर्वाधिक खडतर आणि प्रदिर्घ रॅली पूर्ण केल्यानंतर तुमची आधीची ओळख पूर्णपणे बदलते. आमच्या रॅली वर्तुळात तशा आशयाची एक उक्तीही आहे. डकार फिनीश केलेला रॅली ड्रायव्हर म्हणूनच लोक तुमच्याकडे बघतात. डकारनंतर एक रॅली ड्रायव्हर म्हणूनच नव्हे तर एक व्यक्ती म्हणूनही माझ्यात अनेक बदल झाले. मी अधिक धाडसी आणि त्याचवेळी संयमीही बनलो. एकूणच जीवनाकडे बघताना स्वतःविषयीचा दृष्टिकोन परिपक्व बनला. या वर्षाच्या प्रारंभी त्या १६ दिवसांतील अनेक क्षणी माझा शारिरीक आणि मानसिक कस लागला, पण कोणत्याही क्षणी मी हार मानायची नाही, कच खायची नाही, ११० टक्के प्रयत्न धसास लावायचे हे मी शिकलो.

इतके खडतर आव्हान पेलत डकार रॅली फिनीश केल्यामुळे निर्माण झालेला रोमांच अजून किती कायम आहे, काही वेळा आपल्याच कामगिरीवर आपला विश्वास बसत नाही अशीही स्थिती होते. त्याविषयी भावना व्यक्त करताना संजय म्हणाला की, हा रोमांच कदापि कमी होणार नाही, कारण त्यावेळी तुम्ही प्रत्येक क्षण जगलेला असता. सामान्य जीवनात कधीच मिळू शकणार नाहीत असे जिवंत अनुभव तुम्ही घेत असता. वाळूच्या छोट्या-मोठ्या टेकड्यांचा जणू कधीच न संपणाऱ्या मार्गावरून कार चालविताना एकीकडे येणारे दडपण आणि दुसरीकडे निर्माण होणारी जिगर अशा अनुभवांचे मिश्रण क्षणोक्षणी साधले जाते. त्यामुळे हे क्षण तुम्ही कधीही विसरू शकत नाही.

पदार्पणात डकार रॅली फिनीश केल्यामुळे कोणत्या जमेच्या बाजू महत्त्वाच्या वाटतात, या प्रश्नावर संजयने सांगितले की, वाळवंटात ड्रायव्हिंग करणे हा एक आश्चर्यजनक अनुभव असतो. त्यामुळे तुमचे मनोधैर्य भक्कम बनते. जेव्हा तुम्ही डकारचे आव्हान पेलता, तेव्हा जीवनातील इतर आव्हाने तुम्हाला तुलनेने सोपी वाटतात.

जमेचे हे दुवे एकत्र करून त्यानुसार कशी पूर्वतयारी सुरू आहे, या प्रश्नावर संजय म्हणाला की, डकारसाठी मी तीन वर्षांची योजना आखली आहे. पदार्पणाचे वर्ष तर फार दमदार ठरले. दर वर्षी मी वरच्या गटात मी सहभागी होणार आहे.

पूर्वतयारीचा भाग म्हणून संजयने या वर्षात वेगवेगळ्या रॅलींमध्ये भाग घेतला. त्याने थायलंडमधील फोर बाय फोर रॅली केली. आशियाई क्रॉस कंट्री रॅलीतही तो सहभागी झाला. याशिवाय सप्टेंबर महिन्या मोरोक्कोतील वाळवंटात एका आठवड्याच्या शिबीरातही तो सहभागी झाला.

फ्रेंच संघाबरोबर संजयचे सूर आणि समन्वय छान जुळला आहे. संघाकडून कामगिरीविषयी काय प्रतिक्रिया येतात आणि कामगिरी उंचावण्यासाठी काय प्रतिसाद मिळतो, याविषयी संजय म्हणाला की, संघ माझ्या कामगिरीविशयी समाधानी आहे.