December 25, 2025

पुणे पर्यटनाला नवी चालना; पीएमपीएमएलच्या मार्ग क्रमांक ६ व ७ मध्ये नव्या स्थळांचा समावेश

पुणे, २४ डिसेंबर २०२५ : पुणे आणि परिसरातील पर्यटन आता अधिक समृद्ध होणार आहे. पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपीएमएल) यांनी आपल्या लोकप्रिय पर्यटन बससेवेतील मार्ग क्रमांक ६ आणि ७ मध्ये नव्या प्रेक्षणीय स्थळांचा समावेश केला असून, विशेष बाब म्हणजे तिकीट दरात कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. यामुळे प्रवाशांना त्याच दरात अधिक धार्मिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक स्थळांचे दर्शन घेता येणार आहे.

पर्यटन बससेवेला मिळणाऱ्या वाढत्या प्रतिसादाच्या पार्श्वभूमीवर पीएमपीएमएलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक पंकज देवरे यांच्या निर्देशानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. पीएमपीएमएल सध्या एकूण १३ स्वतंत्र पर्यटन बस मार्ग चालवत असून, या सर्व मार्गांना पर्यटक आणि शहरवासीयांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.

मार्ग क्रमांक ६ मध्ये नवे ठिकाण
पुणे स्टेशन–स्वारगेट–हडपसर या मार्गावर धावणाऱ्या पर्यटन बस मार्ग क्रमांक ६ मध्ये दौंड तालुक्यातील यवत येथील दरेकर वाड्याचा समावेश करण्यात आला आहे. या वाढीनंतर या मार्गावरील प्रवास पुढीलप्रमाणे असेल :
पुणे स्टेशन → स्वारगेट → हडपसर → रामदरा → थेऊर गणपती → प्रयागधाम → दरेकर वाडा (यवत) → हडपसर → स्वारगेट

मार्ग क्रमांक ७ मध्ये वारसा व निसर्गस्थळांचा समावेश
पर्यटन बस मार्ग क्रमांक ७ मध्येही नव्या प्रेक्षणीय स्थळांची भर घालण्यात आली आहे. मोरांसाठी प्रसिद्ध असलेली मोराची चिंचोली तसेच शिरूर तालुक्यातील पाबळ गावातील पद्मावती जैन श्वेतांबर मंदिर आणि मस्तानी समाधी या ऐतिहासिक स्थळांचा या मार्गात समावेश करण्यात आला आहे.

या मार्गावर यापूर्वीच वाघेश्वर मंदिर (वाघोली), वाडे बोल्हाई मंदिर, तुळापूर त्रिवेणी संगम व छत्रपती संभाजी महाराज स्मारक, रांजणगाव गणपती मंदिर आणि भीमा कोरेगाव विजयस्तंभ अशी महत्त्वाची स्थळे समाविष्ट आहेत.

पर्यटन बससेवेचे तिकीट निश्चित दरात उपलब्ध असून, नोंदणीसाठी डेक्कन जिमखाना, पुणे स्टेशन, स्वारगेट, कात्रज, हडपसर आगार, भोसरी बस स्थानक, निगडी तसेच पुणे महापालिका भवनातील अधिकृत पास केंद्रांवर सुविधा उपलब्ध आहे.

पीएमपीएमएलकडून पर्यटक व पुणेकरांना आवाहन करण्यात आले आहे की, कमी खर्चात सुरक्षित आणि सोयीस्कर प्रवासातून पुणे परिसरातील ऐतिहासिक, धार्मिक व निसर्गरम्य स्थळांचा अनुभव घेण्यासाठी या पर्यटन बससेवेचा अधिकाधिक लाभ घ्यावा.