पुणे, २४ डिसेंबर २०२५: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी पक्षांतर्गत वादातून राजीनामा दिलेला असताना दुसऱ्या बाजूला पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेससह महाविकास आघाडी मिळून एकत्र निवडणूक लढविण्यातबाबत आणखी एक पाऊल पुढे पडले आहे. या सर्व पक्षाच्या पदाधिकार्यांच्या बैठकित जागा वाटपावर बुधवारी सकारत्मक चर्चा होऊन त्यासंबधीच्या प्रस्तावाला तत्वता मंजुरी देण्यात आली. त्यामुळे पुण्यात भाजप विरोधात सर्व पक्षीय असा पुणे पॅटर्न होण्याची शक्यता आहे.
महापालिका निवडणूकांसाठी स्थानिक पातळीवर समविचारी पक्षांसमवेत आघाडी व युती करण्याचा निर्णय सर्वच राजकिय पक्षांनी घेतला आहे. पुणे महापालिकेत भाजप व शिवसेनेने युती निवडणूक लढण्याचा निर्णय घेतल्याने एकाट्या पडलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षासमवेत आघाडी करण्यासाठी पाऊले उचलली. दोन्ही पक्षातील चर्चेनंतर अखेर हे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याचे निश्चित झाले आहे. त्यातच आता दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेससह काँग्रेस, शिवसेना ठाकरे पक्ष आणि मनसेही एकत्र येऊन निवडणूक लढविण्याची रणनिती सुरू आहे. यासंदर्भात या सर्व पक्षांच्या प्रमुख पदाधिकार्यांची सोमवारी रात्री प्राथमिक बैठक झाली होती. त्यानंतर बुधवारी पुन्हा या सर्व पदाधिकार्यांची एकत्रित बैठक झाली. या बैठकित जागा वाटपाचे सुत्र निश्चित करण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पवार गटाचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी दिली. जागा वाटपाचा जो फॉर्म्युला निश्चित करण्यात आला आहे. त्याला सर्व घटक पक्षांनी तत्वता मंजुरी दिली असल्याचेही काकडे यांनी सांगितले. तसेच शिवसेना ठाकरे पक्षाकडून देण्यात आलेल्या जागा वाटपात मनसेच्या जागांचा समावेश असून दोन्ही राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना ठाकरे पक्ष आणि मनसे असे सर्व पक्ष एकत्रित येऊन निवडणूक लढविण्याबाबत सकारात्मक आहे. मात्र, यासंबधीचा निर्णय संबधित पक्षाचे वरिष्ठ नेते घेणार असून त्यांनी मंजुरी दिल्यानंतरच या महाविकास आघाडीवर शिक्कामोर्तब होईल असे काकडे यांनी सांगितले.
याबैठकिला राष्ट्रवादी पवार गटाकडून काकडे यांच्यासह माजी खासदार ॲड. वंदना चव्हाण, आमदार बापुसाहेब पठारे, माजी आमदार जयदेव गायकवाड, विशाल तांबे, राष्ट्रवादी काँग्रेसकडून शहराध्यक्ष सुनिल टिंगरे, सुभाष जगताप, राजलक्ष्मी भोसले, शिवसेना ठाकरे गटाकडून शहरप्रमुख गजानन थरकुडे, संजय मोरे, काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, माजी मंत्री रमेश बागवे, ॲड. अभय छाजेड उपस्थित होते.

More Stories
Pune: बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय व ससून रुग्णालयात परिचारिकांसाठी निशुल्क कार्यशाळा संपन्न
Pune: बाणेर-बालेवाडीत पवारांचा डाव; मुरकुटेंच्या भेटीने राजकीय खळबळ
“मी गुपचूप कुठेही गेलो नाही!” – प्रशांत जगताप यांचा राष्ट्रवादीला ठाम रामराम