December 25, 2025

Pune: बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय व ससून रुग्णालयात परिचारिकांसाठी निशुल्क कार्यशाळा संपन्न

पुणे, २५/१२/२०२५: बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय व ससून रुग्णालय, पुणे येथे महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशन, पुणे संघटनेच्या वतीने 12 आणि 13 डिसेंबर 2025 रोजी परिचारिकांसाठी दोन दिवसीय निशुल्क कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत परिचारिकांसाठी आवश्यक नॉन-क्लिनिकल कौशल्ये, मार्गदर्शन आणि नवीन दिशा या विषयांवर सत्रे घेण्यात आली.

भारतीय परिचर्या परिषदच्या मार्गदर्शक सूचना व न्यायालयाच्या आदेशानुसार राज्यातील परिचारिकांना नोंदणी नूतनीकरणासाठी 150 क्रेडिट तासांचे निरंतर व्यावसायिक शिक्षण (CNE) घेणे बंधनकारक आहे. त्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यात प्रथमच संघटनेच्या वतीने CNE कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.

कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एकनाथ पवार, ससून रुग्णालयाचे अधीक्षक यल्लापा जाधव, प्रमुख प्रशासकीय अधिकारी मगर, प्रशासकीय अधिकारी गोरोबा आवटे, उप-अधीक्षक सोमनाथ खेडकर, अधिसेविका विमल केदार, परिचर्या महाविद्यालयाच्या प्राचार्या मृण्मयी देशपांडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. तसेच संघटनेच्या पुणे शाखेच्या अध्यक्षा रेखा थिटे, सचिव माधुरी ओंबाळे यांची उपस्थिती होती.

अधिसेविका विमल केदार यांनी या उपक्रमाचे कौतुक करत परिचारिकांसाठी अशा कार्यशाळा उपयुक्त असल्याचे सांगितले. कार्यशाळेत विमल केदार, मृण्मयी देशपांडे, निर्मला आडसूळ, मंगल मेढे, निता वडणे यांसह तज्ञांनी विविध महत्त्वाच्या विषयांवर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन वैशाली शितोळे व छाया पानसरे यांनी केले, तर आभार प्रदर्शन सायरा खान यांनी केले.