December 25, 2025

Pune: बँक कर्मचाऱ्यांचे नववे अधिवेशन २७ व २८ डिसेंबर रोजी

पुणे, 25/12/2025: ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन (एआयबीईए) संलग्नित ऑल इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉईज फेडरेशनचे (एआयबीओएमईएफ) दोन दिवसीय नववे अखिल भारतीय अधिवेशन पुण्यात आयोजित करण्यात आले आहे. येत्या शनिवारी (ता. २७) व रविवारी (ता. २८) या दोन दिवशी हे अधिवेशन कॉ. सुरेश धोपेश्वरकर नगरी, दादासाहेब दरोडे सभागृह, बीएमसीसी जवळ, शिवाजीनगर, पुणे होणार आहे. देशभरातील ५०० पेक्षा अधिक बँक कर्मचारी या अधिवेशनात सहभागी होणार आहेत.
या अधिवेशनाचे उद्घाटन शनिवारी (ता. २८) सकाळी १०.३० वाजता ‘एआयबीईए’चे सरचिटणीस कॉ. सी. एच. वेंकटचलम यांच्या हस्ते, बँक ऑफ महाराष्ट्रचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी निधू सक्सेना यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. बँक ऑफ इंडियाचे माजी महाव्यवस्थापक व्ही. सी. जोशी, बँक ऑफ महाराष्ट्र ऑफिसर्स असोसिएशनचे सरचिटणीस कॉ. कृष्णा बरुरकर, ‘एआयबीईए’चे उपाध्यक्ष कॉ. एन. शंकर, संयुक्त सरचिटणीस कॉ. ललिता जोशी विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
अधिवेशनाच्या निमित्ताने दिला जाणारा दुसरा ‘कॉ. सुरेश धोपेश्वरकर स्मृती पुरस्कार’ यंदा पद्मश्री सुचेता दलाल यांना प्रदान करण्यात येणार आहे. रोख एक लाख रुपये व कार्यगौरव करणारे सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. वित्त क्षेत्रातील त्यांचे मोलाचे योगदान, तसेच बचतदार व गुंतवणूकदारांना पैशांच्या संरक्षणासाठी केलेले मार्गदर्शन व जनजागृती याची दखल घेऊन हा पुरस्कार देण्यात येत आहे. १९९२ मधील हर्षद मेहता घोटाळा उघडकीस आणणाऱ्या त्यांच्या शोध पत्रकारितेमुळे त्या देशभरात परिचित आहेत.
अधिवेशनात दुसऱ्या दिवशी सकाळी १० वाजता प्रसिद्ध आयटी तज्ज्ञ व लेखक अच्युत गोडबोले यांचे ‘कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि कामगार वर्ग: संधी, आव्हाने आणि पुढील वाटचाल’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. अध्यक्ष कॉ. चंद्रेश पटेल व सचिव कॉ. शैलेश टिळेकर यांच्यासह अन्य सहकारी अधिवेशनाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेत आहेत.
‘एआयबीओएमईएफ’चे सरचिटणीस देविदास तुळजापूरकर म्हणाले, “बँकांचे एकत्रीकरण व खाजगीकरण या केंद्राच्या धोरणांना संघटनेचा विरोध असल्याच्या पार्शवभूमीवर अधिवेशन महत्वपूर्ण आहे. बँक ऑफ महाराष्ट्रच्या शिवाजीनगर येथील स्वमालकीचे ‘लोकमंगल’ मुख्यालय बाणेर येथील भाडेतत्त्वावरील इमारतीत स्थलांतराचा प्रस्ताव आणि बँकेच्या १०० टक्के मालकीच्या उपकंपनी ‘मेटको’च्या विक्रीविरोधात मंथन होणार आहे. तसेच कर्मचाऱ्यांची भरती, त्यांच्या मागण्यांचा पाठपुरावा केला जाणार आहे.”