December 27, 2025

शरद पवारांचा निर्णायक ब्रेक : अजित पवारांशी फारकत

पुणे, २६ डिसेंबर २०२५ : पुण्याच्या राजकारणात मोठी आणि निर्णायक उलथापालथ घडत असून, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेससोबत न जाण्याचा स्पष्ट निर्णय घेतला आहे. त्यामुळे पुणे महापालिकेची आगामी निवडणूक राष्ट्रवादी (शरद पवार), काँग्रेस आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या महाविकास आघाडीच्या माध्यमातूनच लढवली जाणार, हे जवळपास निश्चित झाले आहे.

गेल्या काही दिवसांपासून पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येऊन निवडणूक लढवणार असल्याच्या जोरदार चर्चा सुरू होत्या. या चर्चांमुळेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी पक्षाचा राजीनामा देत थेट काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. मात्र, त्यानंतर अवघ्या काही तासांत शरद पवार यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत न जाण्याचा निर्णय घेतल्याने शहराच्या राजकारणात प्रचंड नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्या.

दिवसभर राजकीय घडामोडींना वेग
शुक्रवारी दिवसभर राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि महाविकास आघाडीतील नेत्यांच्या हालचालींना वेग आला होता. काँग्रेसच्या संसदीय मंडळाच्या बैठकीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेससोबत न जाण्याचा ठाम निर्णय घेण्यात आला. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रमुख नेत्यांची स्वतंत्र बैठक झाली.

या बैठकीनंतर शरद पवार गटातील काही नेत्यांनी दुपारी अजित पवार यांची भेट घेतली. यावेळी जागावाटप आणि निवडणूक चिन्हांवर चर्चा झाली. मात्र, ‘घड्याळ’ चिन्हावर अजित पवार गटाचा आग्रह आणि त्यास शरद पवार गटाचा ठाम नकार यामुळे चर्चांना पूर्णविराम मिळाला. त्यानंतर शरद पवार गटाची पुन्हा स्वतंत्र बैठक झाली आणि महाविकास आघाडीसोबतच निवडणूक लढवण्याचा अंतिम निर्णय घेण्यात आला.

या निर्णयाची माहिती थेट काँग्रेस नेतृत्वाला देण्यात आली. रात्री उशिरा महाविकास आघाडीच्या घटक पक्षांच्या जागावाटपाच्या बैठकांना पुन्हा सुरुवात झाली. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याची शक्यता पूर्णपणे मावळल्याचे स्पष्ट झाले आहे.

अजित पवार गटाची हालचाल, महाविकास आघाडीचा दावा
महाविकास आघाडीबरोबर काडीमोड होणार हे लक्षात येताच अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने दुपारपासूनच इतर पक्षांतील प्रभावी उमेदवारांशी संपर्क वाढवला आहे. शिवसेना तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील काही नेत्यांना आकर्षित करण्याचे प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे.

दरम्यान, पुण्यात महाविकास आघाडी एकत्र राहिल्याने भाजपकडून आघाडीत फूट पाडण्याचा डाव अपयशी ठरल्याचा दावा तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी केला आहे.

प्रशांत जगताप प्रवेशामुळे चर्चांना उधाण
दरम्यान, शुक्रवारी दुपारी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला रामराम ठोकून प्रशांत जगताप यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने शहराच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना विश्वासात न घेता हा प्रवेश झाल्याने शरद पवार गटातील अनेक नेत्यांनी उघड नाराजी व्यक्त केली होती. मात्र, त्यानंतर शरद पवार गटाने महाविकास आघाडीतच राहण्याचा निर्णय घेतल्याने या घडामोडींकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष केंद्रीत झाले आहे.

पुणे महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांचा हा निर्णय राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलणारा ठरणार असून, आगामी दिवसांत आणखी मोठ्या हालचाली पाहायला मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.