May 4, 2024

पुणे: रेमीडेसिव्हीर इंजेक्शनचा काळाबाजार करणाया दोन टोळ्या पकडुन एकुण ५ आरोपींना युनिट ४ गुन्हे शाखा यांनी केले जेरबंद

मुबारक अंसारी
पुणे, 16 एप्रिल 2021: करोना विषाणू बाधित रुग्णाच्या उपचारासाठी वापरण्यात येणारे रेमिडिसिव्हर इंजेक्शनची अनधिकृतपणे ज्यादा दराने विक्री करणाऱ्या ५ आरोपींना पोलीसांच्या गुन्हे शाखेने अटक केले.

गेल्या आठवडाभरापासून शहरात या इंजेक्शन चा तुटवडा निर्माण झाला आहे. हे इंजेक्शन मिळविण्यासाठी रुग्नाच्या नातेवाईकांना बरीच धावपळ करावी लागत आहे. मात्र त्यानंतरही इंजेक्शन उपलब्ध न झाल्याने नातेवाईक संतप्त होत आहे.

अशातच या इंजेक्शन चा काळाबाजार करणारी एक टोळी सक्रिय झाली असून, मोठ्या प्रमाणात काळाबाजार होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी विशेष मोहीम हाती घेतली असुन सर्व पोलीस स्टेशन व गुन्हे शाखेची पथके कार्यान्वित केलेली आहेत.

पोलिसांनी हवालदार रमजान शेख यांना मिळालेल्या माहितीच्या आधारावर, गुन्हे शाखा युनिट -4मधील सहायक पोलीस निरीक्षक संदिप जमदाडे, पोलीस उप निरीक्षक जयदिप पाटील व अधिनस्त पोलीस अंमलदार यांच्या पथकाने वाघोली येथे कारवाई केली. याठिकाणी रोहीदास गोरे ही व्यक्ती रेमीडेसिव्हीर हे इंजेक्शन काळाबाजार करुन 10,000/- रुपयास एक इंजेक्शन विकत असल्याचे त्यांना आढळले. याबाबत अन्न व औषध प्रशासन विभागाच्या औषध निरीक्षक श्रृतीका जाधव यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारावर लोणीकंद पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला.

दुसया कारवाईमध्ये गुन्हे शाखा युनिट-4 कडील रुपेश वाघमारे यांना बातमी मिळाली कि, डिमेलो पेट्रोलपंप नगररोड जवळ एक व्यक्ती बरेमीडेसिव्हर हे इंजेक्शन काळाबाजार करुन 18,000/- रु किंमतीस विकत आहे. मिळालेल्या बातमीचे अनुषंगाने एक डमी गिहाईक पाठविले असता, मोहम्मद मेहबुब पठाण (वय 28, रा. शालीमार चौक, अपोझीट जे 183 रेल्वे क्वाटर्स, दौंड) व त्याचे तीन साथीदार नामे इम्तीयाज युसूफ अजमेरी ( वय- 52, रा. चंदननगर), परवेज मैनोद्दीन शेख (वय 36,रा. तुकाईनगर, दौंड) आणि अश्विन विजय सोळंकी (वय 41, रा. येरवडा) यांचेकडे रेमीडेसिव्हीर इंजेक्शनची 2 बॉटल आढळले. त्यावर ‘केवळ राज्यशासनाकरिता, विक्री साठी मनाई) असे लिहलेले आढळले. या गुन्ह्याच्या रॅकेटमधील 4 आरोपींना पकडले असुन इतरही आरोपींचा सहभाग निष्पन्न होण्याची शक्यता आहे. त्यांचयाविरुध्द दिनेश खिंवसरा, औषध निरीक्षक,अन्न व औषध प्रशासन यांनी तक्रार दिली.

पुणे शहर पोलीसांकडुन, अन्न व औषध प्रशासन, पुणे यांच्या मदतीने सदर इजेक्शनच्या काळाबाजारावर कारवाई तीव्र करण्यात आली असून आतापर्यत वेगवेगळया कारवाईत 7 आरोपी अटक करण्यात आले असून 7 रेमीडेसिव्हीर इजेक्शनच्या बाटल्या जप्त करण्यात आलेल्या आहेत.

सदरची कामगिरी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांचे आदेशाने अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, पोलीस उप आयुक्त, गुन्हे श्रीनिवास घाडगे, सहायक पोलीस आयुक्त गुन्हे – 2 पुणे लक्ष्मण बोराटे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट- 4 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रजनिश निर्मल व युनिट कडील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी केली आहे.

रेमीडेसिव्हर इंजेक्शनचा काळाबाजार होत असल्याची नागरिकांना माहीती असल्यास त्यांनी त्वरीत पुणे शहर पोलीसांशी संपर्क साधावा असे आवाहन पोलीस आयुक्त पुणे शहर अमिताभ गुप्ता यांनी केले आहे.