September 23, 2025

अन्न व औषध प्रशासनातर्फे धडक मोहिमेत गणेश उत्सव कालावधीत अन्नपदार्थांचा ३१ लाख रुपयांचा साठा जप्त

पुणे, 05 ऑक्टोबर 2023: गणेश उत्सव कालावधीत अन्न व औषध प्रशासन विभागाने पुणे जिल्ह्यात धडक मोहीम राबवून दूध, गाईचे तुप, भेसळयुक्त बटर, स्वीट खवा व वनस्पती आदी अन्न पदार्थांचा एकूण ३१ लाख २ हजार ४७ रूपयांचा साठा जप्त करण्यात आल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाने दिली आहे.

नागरिकांचे सार्वजनिक आरोग्य व जनहित विचारात घेवून नागरिकांना स्वच्छ, निर्भेळ अन्न प्राप्त व्हावे याकरिता गणेश उत्सवाच्या कालावधीत पुणे जिल्ह्यात ३०८ तपासण्या करण्यात आल्या. त्यापैकी १४४ आस्थापनांना सुधारणा नोटीस बजावण्यात आली. जिल्ह्यात अन्न आस्थापनेतून दूध, खवा, पनीर, स्वीट मावा, गाईचे तूप, बटर व वनस्पती इत्यादी अन्न पदार्थांचे एकूण १५० अन्न नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आले. विश्लेषण अहवाल प्राप्त होताच कायद्यानुसार पुढील कारवाई करण्यात येणार आहे.

ही कारवाई अन्न व औषध प्रशासनचे पुण्यातील सर्व सहायक आयुक्त (अन्न), अन्न सुरक्षा अधिकारी यांनी पार पाडली. सणासुदीच्या दरम्यान विक्री करण्यात येणाऱ्या अन्न पदार्थामध्ये भेसळ संदर्भात काही संशय असल्यास जागरुक नागरीकांनी प्रशासनाचा टोल फ्री क्रमांक १८००२२२३६५ यावर संपर्क साधावा, असे आवाहन पुणे विभागाचे सह आयुक्त (अन्न) सुरेश अन्नपुरे यांनी केले आहे.