September 24, 2025

धकधकत्या युद्धभूमीवर देशाचे प्रतिनिधित्व करीत मानवतेसाठी काम करण्याची संधी मिळाली

पुणे, दि. ३ डिसेंबर, २०२३ : एक डॉक्टर म्हणून युद्ध भूमीवर वैद्यकीय सेवा देत कार्यरत असताना किमान साधनांमध्ये आम्हाला जास्तीत जास्त चांगल्या सुविधा द्याव्या लागत असत. आजूबाजूला बॉम्ब शेलिंग होत असताना न थरथरता हाताने रुग्णांचे ऑपरेशन करण्याचे काम जिकिरीचे होते. धकधकत्या युध्यभूमीवर देशाचे प्रतिनिधित्व करीत मानवतेसाठी काम करण्याची संधी मिळाली याबद्दल मी कायम ऋणी असेल, असे उद्गार अस्थिरोगतज्ज्ञ डॉ भरत केळकर यांनी काढले.

पुण्यातील भाषा फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थेच्या वतीने आणि भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्था व गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्था यांच्या सहकार्याने आयोजित कथायात्रेमध्ये सिरीयाच्या युद्धभूमीवर सेवारत मराठी डॉक्टरची कहाणी आज उपस्थितांसमोर उलगडली. यावेळी डॉ भरत केळकर यांच्या अनुभवकथनाने उपस्थितांच्या अंगावर शहारे आले.

सदर कार्यक्रम विधी महाविद्यालय रस्त्यावरील भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेच्या नवलमल फिरोदिया सभागृहात संपन्न झाला. डॉ भरत केळकर लिखित आणि मनोविकास प्रकाशन प्रकाशित ‘डॉक्टर्स ऑन अ वॉर फ्रंट’ या पुस्तकाचे प्रकाशन देखील यावेळी संपन्न झाले. रिअर ॲडमिरल आशिष कुलकर्णी, भाषा फाउंडेशनच्या अध्यक्षा व कथायात्रेच्या रचनाकार स्वाती राजे, जयदीप राजे, डॉ सविता केळकर, मनोविकास प्रकाशनचे आशिष पाटकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

यावेळी आपले अनुभव सांगताना डॉ केळकर म्हणाले, युद्धभूमीवर आपल्याला प्रत्येक श्वासाची, आपल्या जवळच्या माणसांची, मित्रांची, देशाची किंमत कळते.  यावेळी भारतात राहणारे आपण आपल्या देशात किती सुखी आहोत याची प्रकर्षाने जाणीव होते. युद्ध प्रवण क्षेत्रात आपल्या भाषा, आहार, संस्कृती, धर्म वेगळा असला तरी सहानुभूती, माणुसकी ही या सर्वांवर मात करून जिंकते असे मला वाटते.”

आपण जग बदलू शकत नसलो तरीही आपल्या पद्धतीने काही प्रमाणात का होईना मदत करू शकतो आहोत हे समाधान मला या कामाने दिले, असेही डॉ केळकर यांनी सांगितले.

डॉ भरत केळकर यांनी २०१४ साली सिरीया, २०१६ साली येमेन आणि २०१८ साली इराक येथे युद्धात जखमी नागरिकांचे उपचार करण्यासाठी काम केले आहे. “मी आणि माझी पत्नी सामाजिक क्षेत्रात सुरुवातीपासूनच कार्यरत होतोच. पण आपले कौशल्य जास्तीत जास्त कुठे उपयोगी ठरेल या विचारातून मी एमएफएसचे ‘डॉक्टर्स विदाऊट बॉर्डर्स’ या उपक्रमात सहभागी झालो आणि त्यानंतर तीन वेळा या मोहिमा केल्या, असेही त्यांनी सांगितले.

आज मी डॉक्टर म्हणून मागील ४० वर्षे कार्यरत आहे. या मोहिमांना मला अनुभवसंपन्न केले. माझ्या इतर मित्रांनी त्यांच्या त्यांच्या व्यवसायात पैसे कमावले असतील, मी तेवढे नाही कमावू शकलो. पण, मी माणूस म्हणून काम करीत आत्मिक समाधान कमावले असे मला नेहमी वाटते असे सांगत केळकर पुढे म्हणाले की, “आपल्या देशात आपण सुखाने जगतो आहोत. आपण सुरक्षित आहोत म्हणून भाग्यवान आहोत. जेथे वॉर झोन आहेत तेथे युद्धामुळे अनेक नागरिकांचे जीवन उद्ध्वस्त झाले आहे हे मी अगदी जवळून पाहिले. ही हानी केवळ देश, शहर, समाजाची नव्हती ही हानी वैयक्तिक पातळीवर देखील होती. यातून होणाऱ्या त्रासापासून सुटका मिळावी म्हणून अनेकांनी आत्महत्या देखील केल्या आहेत.”

मी जगातील या युद्धभूमीवर वैद्यकीय काम करत असताना भारतीय सैन्यासाठी सरकारकडून सैन्याला उत्तम मेडिकल सपोर्ट मिळतो याचा मला आनंद आहे. एक भारतीय डॉक्टर म्हणून मला सर्वच ठिकाणी नागरिकांनी आणि सहकाऱ्यांनी खुल्या मनाने मला स्वीकारले असे सांगत अनेक आठवणींना देखील त्यांनी उजाळा दिला. कोविड काळात भारताने जगाला केलेली मदत हा त्याचाच भाग असून जागतिक पातळीवर त्याचे कौतुक झाले आहे, असेही ते म्हणाले.

या आधी कथायात्रेच्या दुसऱ्या दिवसाच्या दुपारच्या सत्रात भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेसाठी वेरूळ लेण्यांचे डिजिटायजेशन करणारे डॉ रवींद्र बोरावके यांचे व्याख्यान संपन्न झाले. वेरूळ येथील भग्न मूर्ती चांगल्या स्थितीत असत्या तर कशा दिसल्या असत्या हे अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून दाखविण्याचा प्रयत्न डॉ बोरावके यांनी केला आहे. आपल्या या कामाबद्दल बोलताना डॉ बोरावके म्हणाले, “छायाचित्र काढण्याची आवड होती. ती काढत असताना भग्न मूर्ती पाहण्यात आल्या. या मूर्ती सुयोग्य पद्धतीत असताना किती सौंदर्यपूर्ण असतील, हा विचार मनात आला आणि त्यांचे डिजिटायजेशन सुरु केले. आज वेरूळ लेण्यांमधील कैलास मंदिराचे डिजिटायजेशन सुरू असून वेरूळ येथील एक जैन लेणी पूर्ण करायला मला ४-४ महिने लागले. एका मूर्तीचे किमान १५०-२५० फोटो मी काढत असतो आणि मग पुढे त्यावर काम सुरु होते.” त्या मूर्तीची नैसर्गिक आणि इतर कारणांमुळे झालेली हानी लक्षात घेत ती मूर्ती समजून घ्यावी लागते. अनेकदा तासनतास मी एखाद्या भग्न मूर्तीला न्याहाळत बसतो आणि अचानक एका क्षणी ती मूर्ती कोणाची असावी, किंवा भग्न भाग कशाचा असावा याचा साक्षात्कार होतो, असे अनुभवही त्यांनी सांगितले.