September 24, 2025

बेगम परवीन सुलताना यांना यावर्षीचा वत्सलाबाई पुरस्कार यांना जाहीर

पुणे दि. ४ डिसेंबर, २०२३ : आर्य संगीत प्रसारक मंडळाच्या वतीने देण्यात येणारा वत्सलाबाई जोशी पुरस्कार यावर्षी पतियाळा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका पद्मभूषण बेगम परवीन सुलताना यांना जाहीर झाला असल्याची घोषणा मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी यांनी केली.

भारतीय शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रात बहुमोल योगदान देणाऱ्या कलाकारांना २००७ सालापासून मंडळाच्या वतीने दरवर्षी सदर पुरस्कार देत गौरविण्यात येते. रोख रु. ५१ हजार व मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप असून मुकुंदनगर येथील महाराष्ट्रीय मंडळाचे क्रीडांगण येथे १३ ते १७ डिसेंबर दरम्यान होणा-या ६९ व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवात बेगम परवीन सुलताना यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याचेही जोशी यांनी संगितले.

महोत्सवात असणा-या चित्रप्रदर्शनाविषयी माहिती देताना प्रकाशचित्रकार सतीश पाकणीकर म्हणाले, “दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवात चित्रप्रदर्शनाचे आयोजन करण्यात येणार असून ‘स्वरचित्र आदरांजली’ असे त्याचे नाव असेल. यावर्षी पं. कुमार गंधर्व, पं. राम मराठे आणि पं. सी. आर. व्यास या तीन कलाकारांचे जन्मशताब्दी वर्ष असल्याने प्रदर्शनाचा एक भाग हा त्यांना समर्पित असणार आहे. याबरोबरच सवाई गंधर्व महोत्सवात आपली अवर्णनीय कला सादर करणारे काही कलाकार गेल्या काही वर्षांत कालवश झाले त्यांना समर्पित असा एक भाग असेल. प्रदर्शनाच्या तिसऱ्या भागात भारतरत्न पं भीमसेन जोशी यांचा इतर कलाकारांशी असलेला स्नेह व्यक्त करणारी काही प्रकाशचित्रे व त्याबरोबरच किराणा घराण्याचे महान कलावंत असलेले कलाकारांच्या प्रकाशचित्रांचा समावेश असणार आहे.”

दरवर्षीप्रमाणे याही वर्षी एरंडवणे येथील कमला नेहरू पार्क समोरील शिरीष ट्रेडर्स, शनिपार येथील बेहरे आंबेवाले, सहकारनगर येथील अभिरुची फुडस, कर्वे नगर येथील देसाई बंधू आंबेवाले, कर्वे नगर येथील हेल्दी बगीचा, टिळक रस्ता येथील ग्राहक पेठ या ठिकाणी रसिकांना सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाची तिकिटे उपलब्ध होऊ शकणार आहेत. संपूर्ण महोत्सवाच्या प्रवेशिका या खुर्चीसाठी रु ४ हजार व २ हजार रुपये इतक्या असणार असून भारतीय बैठकीसाठी संपूर्ण महोत्सव प्रवेशिका या ५०० रुपये असतील. वर नमूद ठिकाणांव्यतिरिक्त ticketkhidakee.com येथे देखील महोत्सवाच्या ऑनलाईन प्रवेशिका उपलब्ध असतील याची नोंद घ्यावी

महोत्सवानंतर घरी जाण्यासाठी ज्या बसमार्गांवर पीएमपीएमएलची सेवा उपलब्ध असतील ते मार्ग खालीलप्रमाणे-

– मुकुंदनगर ते कार्यक्रमानंतर भक्ती शक्ती चौक, निगडी
– मुकुंदनगर ते कार्यक्रमानंतर सिंहगड रस्ता (मारुती मंदिर, धायरी)
– मुकुंदनगर ते कार्यक्रमानंतर कोथरूड डेपो (पौड रस्ता)
– मुकुंदनगर ते पुन्हा कार्यक्रमानंतर वारजे माळवाडी