September 24, 2025

क्रेडाई पुणे मेट्रोच्या सभागृहाचे ‘रामकुमार राठी सभागृह’ असे नामकरण

पुणे, दि. १४ डिसेंबर, २०२३ : क्रेडाई पुणे मेट्रोचे दिवंगत संस्थापक अध्यक्ष असलेले स्वर्गीय रामकुमार राठी यांचे गेल्या महिन्यात वयाच्या ८१ व्या वर्षी निधन झाले. त्यांना श्रद्धांजली वाहण्याच्या हेतून कॉन्फेडरेशन ऑफ रिअल इस्टेट डेव्हलपर्स ऑफ इंडियाच्या वतीने कॅम्प परिसरातील न्युक्लियस मॉल येथे असलेल्या क्रेडाई पुणे मेट्रोच्या कार्यालयातील सभागृहाचे नामकरण रामकुमार राठी सभागृह असे करण्यात आले आहे. नुकत्याच झालेल्या श्रद्धांजली सभेवेळी हे नामकरण करण्यात आले. रामकुमार राठी हे रिअल इस्टेट आणि भांडवली बाजार यांसारख्या क्षेत्रातील दिग्गज म्हणून ओळखले जायचे.

बांधकाम व्यवसायिकांसाठी एक व्यासपीठ असले पाहिजे या उद्देशाने राठी यांनी १९८२ साली प्रमोटर्स अँड बिल्डर्स असोसिएशन ऑफ पुणे (पीबीएपी) ही संस्था स्थापन करण्यात मोलाची कामगिरी बजावली. याच संस्थेचे नामकरण पुढे कॉन्फेडरेशन ऑफ रिअल इस्टेट डेव्हलपर्स ऑफ इंडिया अर्थात क्रेडाई असे झाले आज दिल्ली येथे संस्थेचे मुख्य कार्यालय असून क्रेडाई ही संस्था देशभरातील बांधकाम व्यवसायिकांची सर्वोच्च संस्था म्हणून ओळखली जाते. आज २१ राज्यांमधील २३० शहरांमध्ये संस्थेचे विभाग असून १३ हजार ३०० बांधकाम व्यवसायिक संस्थेचे सदस्य आहेत.

श्रद्धांजली अर्पण करताना क्रेडाई पुणे मेट्रोचे अध्यक्ष रणजीत नाईकनवरे म्हणाले, “क्रेडाई संस्थेच्या निर्मितीमध्ये महत्त्वाचा वाटा असलेले संस्थेचे संस्थापक अध्यक्ष म्हणून रामकुमार राठी कायमच स्मरणात राहतील. एक उत्कृष्ट बांधकाम व्यवसायिक असलेल्या राठी यांचा हे क्षेत्र संघटीत व्हायला हवे याबरोबरच ते संघटीत बनविण्यावर दृढ विश्वास होता हे विशेष. त्यांनी केवळ क्रेडाईचा पाया रचण्यातच नव्हे तर बांधकाम उद्योगासाठी एक परिसंस्था निर्माण करण्यासाठीही प्रचंड प्रयत्न केले. बांधकाम साहित्याच्या चाचणीसाठी सरकारी मान्यताप्राप्त प्रयोगशाळा आणि उद्योगातील नवीनतम घडामोडींच्या ज्ञानाच्या देवाणघेवाणीसाठी त्यांनी कॉन्स्ट्रोसारखी प्रदर्शने देखील सुरू केली.”

या शोक सभेत क्रेडाईचे माजी राष्ट्रीय उपाध्यक्ष शांतीलाल कटारिया, क्रेडाईच्या कुशल उपक्रमाचे प्रमुख जे पी श्रॉफ, क्रेडाई महाराष्ट्राचे अध्यक्ष प्रमोद खैरनार आणि क्रेडाई पुणे मेट्रोचे माजी अध्यक्ष सुहास मर्चंट यांनी रामकुमार राठी यांच्याबद्दलच्या त्यांच्या आठवणींना उजाळा दिला.

पुणे कन्स्ट्रक्शन इंजिनीअरिंग रिसर्च अँड रिसर्च फाऊंडेशन, माहेश्वरी विद्या प्रचारक मंडळ, तारा मोबाइल क्रेचे आणि विविध रिअल इस्टेट आणि आर्किटेक्चरल फर्म यासारख्या राठी यांचा जवळचा संबंध असलेल्या इतर संस्थांच्या प्रतिनिधींनी देखील रामकुमार राठी यांच्या बीएआय, एईएसए, आयआयए, आयएसएसई, एमबीव्हीए सारख्या संस्थांच्या उभारणीतील योगदानाबद्दल सांगितले.

फ्रेनी तारापोर, कुमार गेरा, केशव देसाई, रामेश्वर सारडा आणि नाशिकचे जितूभाई ठक्कर, ललित कुमार जैन, अतुल लाहोटी आणि अशोक बेहरे आदींनी यावेळी रामकुमार राठी त्यांची दृष्टी, शासकीय संस्थांना सामोरे जाण्याचे त्यांचे कौशल्य, बांधकाम उद्योगासाठी सामाजिक संस्था आणि इतर संस्था निर्माण करण्यासाठी मदत करण्याची आणि नवीन जबाबदाऱ्या स्वीकारण्याची इच्छा यांविषयी आपल्या भावना मांडल्या.

उपस्थित मान्यवरांनी आपले वडीलांच्या बांधकाम व्यवसाय क्षेत्रातील योगदानाबद्दल व्यक्त केलेल्या भावनांबद्दल रामकुमार राठी यांचे पुत्र राहुल राठी यांनी उपस्थितांचे आणि क्रेडाई पुणे मेट्रोचे आभार मानले. क्रेडाई पुणे मेट्रोचे उपाध्यक्ष राजेश चौधरी आणि क्रेडाई पुणे मेट्रोचे महासंचालक डॉ. डी. के. अभ्यंकर यांनी या शोकसभेच्या आयोजनासाठी सहकार्य केले.