प्राजक्ता मराठे यांच्या प्रभावी गायनाने पूर्वार्ध श्रवणीय
पुणे, दि. १६ डिसेंबर २०२३ : युवा गायिका प्राजक्ता मराठे यांचे प्रभावी गायन आणि देबप्रिय अधिकारी व समन्वय सरकार यांच्या रंगतदार अशा गायन – सतारीच्या सह सादरीकरणाने सवाई गंधर्व भीमसेन संगीत महोत्सवाच्या चौथ्या दिवसाचा पूर्वार्ध सुरेल झाला.
आर्य संगीत प्रसारक मंडळाच्या वतीने आयोजित ६९ व्या सवाई गंधर्व भीमसेन संगीत महोत्सव मुकुंदनगर येथील महाराष्ट्रीय मंडळ क्रीडासंकुलात साजरा होत आहे. मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी, शुभदा मुळगुंद, शिल्पा जोशी, विराज जोशी यावेळी उपस्थित होते.
ज्येष्ठ गायक, संगीतकार पं. राम मराठे यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी, त्यांच्या कलेचा वारसा पुढे नेणाऱ्या युवा गायिका प्राजक्ता मराठे यांना यावर्षी आवर्जून आमंत्रित करण्यात आले होते. प्राजक्ता यांनी पूर्वा रागात ‘मालनहो’ हा ख्याल मांडला. त्याला जोडून पं. राम मराठे यांची ‘नारी चंचल चतुर सुघर’ ही बंदिश त्यांनी सादर केली. ‘पिया कर धर देखो धरकत मोरी छतीया.’, ही प्रसिद्ध रचना (यावरून ‘मधुकर वन वन फिरत करी गुंजारवाला’ हे नाट्यपद रचले आहे) पेश केली. पं. राम मराठे यांनी संगीतबद्ध केलेल्या संगीत मंदारमाला नाटकातील ‘हरी मेरो जीवनप्राण आधार’ ही मिश्र पिलू मधील भक्तीरचना सादर केली. रसिकांच्या आग्रहास्तव त्यांनी ‘सोहं हर डमरू बाजे’ हे राग तोडी मधील नाट्यपद सादर करून गायनाची सांगता केली.त्यांना स्वप्नील भिसे (तबला), सिद्धेश बिचोलकर (हार्मोनियम) तर सानिया वेलंगी आणि वैशाली कुबेर यांनी साथसंगत केली.
रसिकांनी संवाद साधताना प्राजक्ता म्हणाल्या,’ आजोबा पं. राम मराठे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आर्य संगीत प्रसारक मंडळाने मला या स्वरमंचावर सेवेची संधी दिली, हे माझे भाग्य आहे,’.
त्यानंतर देबप्रिय अधिकारी आणि समन्वय सरकार यांच्या गायन आणि सतार सहवादनाने रसिकांना मंत्रमुग्ध केले. कला परंपरेचा वारसा लाभलेल्या घरातील या कलाकारांनी ‘हेमंत’ रागात आलाप, जोड, झाला अशा वादन पद्धतीने सादरीकरणाची सुरवात केली. कंठसंगीतातून आणि सतार वादनातून एका पाठोपाठ एक आवर्तनातून हेमंत रागाचे रूप त्यांनी उलगडत नेले. ध्रुपद शैलीतील नोमतोम करत एक वेगळाच श्रवणीय अनुभव या दोन्ही कलाकारांनी रसिकांना दिली. टप्पा अंगाने जाणारी द्रुत रचना सादर करून त्यांनी सांगता केली. त्यांना सत्यजीत तळवलकर यांनी तबल्याची पूरक साथ केली. दिगंबर जाधव यांनी तानपुरा साथ केली. गायन आणि वादन यांच्या या अप्रतिम सादरीकरणाला रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला. महोत्सवाचे सूत्रसंचालन आनंद देशमुख यांनी केले.
More Stories
Pune: मुळा-मुठेला प्रदूषणातून सुटका? मंजूर झाला तब्बल ८४२ कोटींचा मेगा प्लॅन
Pune: वसतिगृह स्थलांतरामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय
Pune: पीएमआरडीएतील सेवा सुविधा नागरिकांसाठी ऑनलाईन