September 24, 2025

जयपूर पिंक पँथर्सचा पटना पायरेट्सवर रोमांचकारी विजय

पुणे, 17 डिसेंबर 2023: दहाव्या प्रो कबड्डी लीग स्पर्धेत पटना पायरेट्स संघाने पूर्वार्धात आठ गुणांची आघाडी घेतल्यावरही झुंजार पुनरागमन करणाऱ्या जयपूर पिंक पँथर्स संघाने 29-28 असा रोमांचकारी विजय मिळवताना आश्चर्यकारक निकालाची नोंद केली. 
 
श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे बालेवाडी येथील बॅडमिंटन हॉल मध्ये सुरू असलेल्या या लढतीत अजित कुमारने चढाईतील 14 गुणांसह एकूण 16 गुणांची कमाई करताना विजयात बहुमोल वाटा उचलला. 
 
त्याआधी दोन्ही संघांकडून काही चढाया निष्फळ ठरल्यानंतर सचिन आणि अंकितच्या कामगिरीमुळे पायरेट्स संघाने 2-0 अशी सुरुवात केल्यावर संदीप कुमारच्या डू ऑर डाय चढाई मुळे पायरेट्सला 10व्या मिनिटाला 6-1 अशी आघाडी घेता आली. बचाव पटू साजीन चंद्रशेखरच्या उत्कृष्ट पकडीमुळे पँथर्सचे सर्व गडी बाद करून पायरेट्सने 13व्या मिनिटाला 13-3 असे वर्चस्व राखले. पँथर्सच्या अर्जुन देशवालने एकाच चढाईत कृष्णन आणि साजिन यांना बाद केले. तरीही पायरेट्सने सचिनच्या यशस्वी चढाईच्या जोरावर मध्यांतराला 16-8 अशी महत्वपूर्ण आघाडी मिळवली. 
 
संदीपने उत्तरार्धात दोन यशस्वी चढाया करताना पायरेट्सची आघाडी 18-10 अशी वाढवली. तर, सचिनच्या अफलातून चढाईमुळे पँथर्सचे केवळ दोन गडी मैदानात उरले. अजित कुमारने अंकित आणि संदीपला एका चढाईत बाद करूनही पायरेट्सला 29व्या मिनिटापर्यंत 22-15 अशी आघाडी कायम राखता आली. 
 
अजित कुमारने एका पकडीसह दोन गुण मिळवताना पँथर्सची पिछाडी 18-22 अशी कमी केली. तर अंकुशने संदीपची पकड करताना पँथर्सचे वर्चस्व कायम राखले. काही क्षणा नंतरच पायरेट्सचे सर्व गडी बाद करताना पँथर्सने 24-24 अशी बरोबरी साधली. 90 सेकंद बाकी असताना दोन्ही संघ 26-26 अशा बरोबरीत होते. 
 
अखेरच्या क्षणी अजित कुमारने एकाच चढाईत नीरज कुमार आणि साजिनला बाद करून पँथर्स ला 29-26 असे आघाडीवर नेले. पायरेट्सच्या कडव्या झुंजीनंतरही अखेरच्या क्षणी आघाडी कायम राखताना पँथर्सने पायरेट्स वर 29-28 असा निसटता विजय नोंदवला.