September 24, 2025

अर्जुन देशवालच्या कामगिरी मुळे जयपूर पिंक पँथर्सचा युपी योद्धाजवर विजय

पुणे, 20 डिसेंबर 2023: दहाव्या प्रो कबड्डी लीग स्पर्धेत अव्वल खेळाडू अर्जून देशवालला अखेर सुर गवसल्यामुळे सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या गतविजेत्या जयपुर पिंक पँथर्स संघाने युपी योद्धाज संघावर 41-24 असा विजय मिळवताना आपले आव्हान कायम राखले.

श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे बालेवाडी येथील बॅडमिंटन हॉल मध्ये सुरू असलेल्या या लढतीत अर्जून देशवालने 13 गुण मिळवताना विजयात मोलाचा वाटा उचललाच आणि आपल्या प्रतिस्पर्ध्यांनाही इशारा दिला.

दोन्ही संघांनी सावध प्रारंभ केल्यानंतर 10व्या मिनिटाला पँथर्स कडे 6-5 अशी निसटती आघाडी होती. मात्र, सूर गवसलेल्या अर्जुनने जोरदार योद्धाज वर आक्रमन केले. पाठोपाठ पँथर्सचा कर्णधार सुनिल कुमारने विजय मलिकची अप्रतिम पकड करताना चौदाव्या मिनिटाला योद्धाज वर पहिला लोन चढवला. यावेळी पँथर्स कडे 11-6 अशी आघाडी होती.

अर्जून ने त्यांनतर चार चढायांमध्ये चार गडी बाद करताना पँथर्सचे वर्चस्व कायम राखले. पाठोपाठ काही उत्कृष्ट पकडीमुळे पँथर्सने योद्धाज वर केवळ चार मिनीटात दुसरा लोन चढविला. यावेळी पँथर्सकडे 20-7 अशी आघाडी होती. मध्यांतराला 24-9 अशी आघाडी घेणाऱ्या पँथर्सने विजयाची तेव्हाचा निश्चिती केली होती.

याचवेळी सूर गवसलेल्या योद्धाजच्या खेळाडूंनी मध्यांतरानंतर जोरदार प्रयत्न केला. गुरदीपने केलेल्या दोन पकडी आणि परदीप नरवालने केलेल्या चढाया यामुळे पँथर्स वर पहिला लोन चढवताना योद्धाजने आपली पिछाडी 20-28 अशी कमी केली.

बचावत सुधारणा करणाऱ्या योद्धाज साठीही आठ गुणांची पिछाडी भरून काढणे अवघड बनले होते. अर्जून ने अखेरच्या मिनिटाला सुपर रेड करताना योद्धाजवर तिसरा लोन चढविला त्यामुळे पँथर्सने हा सामना 41-24 असा 17गुणांच्या फरकाने जिंकला. या मौसमातील हा जयपुर पिंक पँथर्सचा तिसरा विजय ठरला.