September 24, 2025

22व्या गुरू तेगबहादुर गोल्ड कप फुटबॉल स्पर्धेत साई एफसी, दुर्गा एफसी, सिटी एफसी संघांची विजयी सलामी

पुणे, दि. 24 डिसेंबर 2023 –  गुरू तेगबहादुर फाऊंडेशन यांच्या वतीने आयोजित 22व्या गुरू तेगबहादुर गोल्ड कप फुटबॉल स्पर्धेत बाद फेरीत साई एफसी, दुर्गा एफसी, सिटी एफसी  या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघाचा पराभव करून विजयी सलामी दिली.
खडकी येथील रेंजहिल्स स्पोर्ट्स मैदानावर आजपासून सुरू झालेल्या या स्पर्धेत बाद फेरीत सलामीच्या लढतीत साई फुटबॉल अकादमी संघाने नवमहाराष्ट्र फुटबॉल अकादमी संघाचा 1-0 असा पराभव केला. सामन्याच्या सुरुवातीला दोन्ही संघाच्या आघाडीच्या जोरदार आक्रमण केले. नवमहाराष्ट्रच्या पंकज भोसले, दिपक साकरे यांनी जोरदार चढाया केल्या, पण त्यात त्यांना यश आले नाही. पूर्वार्धात गोलफलक कोराच राहिला.
उत्तरार्धात साई एफसीच्या आघाडीच्या फळीने वेगवान खेळ केला. 48व्या मिनिटाला शुभम रोंदलने अफलातून चाल रचत गोल करून संघाला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर पिछाडीवर असलेल्या नवमहाराष्ट्र संघाने बरोबरी साधण्याचे प्रयत्न केले. पण त्यात त्यांना यश आले नाही. सामन्याच्या शेवट पर्यंत साई एफसी संघाने आपली आघाडी कायम ठेवत नवमहाराष्ट्र संघावर 1-0 असा विजय मिळवला.
दुसऱ्या सामन्यात दुर्गा एफसी संघाने केशव माधव प्रतिष्ठान (केएमपी) इलेव्हन संघाचा 3-1 असा पराभव करून शानदार सुरुवात केली. विजयी संघाकडून मयुर वाघेरे(25मि.), अमन मधुरे(48मि.), नेल्सन पार्टे 58मि. यानी प्रत्येकी एक गोल केला. तर पराभुत संघाकडून श्रीनिवास हसबेल(20मि.)ने एक गोल केला.
तिसऱ्या सामन्यात अथर्व रेवलकर(20मि.), ललित पाटील(62मि.) यांनी केलेल्या प्रत्येकी एक गोलाच्या जोरावर सिटी एफसी संघाने राहुल फुटबॉल अकादमी संघाचा 2-1 असा पराभव करून विजयी सलामी दिली. याआधी स्पर्धेचे उदघाटन पंजाबी कला केंद्रचे अध्यक्ष रजिंदरसिंग वालिया, गुरुद्वारा गुरुनानक दरबार पुणेचे अध्यक्ष चरणजित सिंग सहानी, ऑल पुणे गुरुद्वारा समितीचे चेअरमन संतसिंग मोखा, श्रीगुरु सिंग सभा खडकीचे मुख्य पुजारी ग्यानी चींदरपाल सिंग, पीडीजी लायन एमजेएफ सीए अभय शास्त्री, एमजेएफ लायन दिपक लोहिया, झेडसी अभय गांधी, लायन गिरीश गणात्रा, लायन बलविंदर राना, दर्शन राणा, एलएस नारंग, नरेंदर पाल सिंग, लायन रानी अहलूवालीया यांच्या हस्ते करण्यात आले. गुरू तेगबहादुर फाऊंडेशनचे अध्यक्ष एस. एस. अहलुवालिया यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
निकाल: बाद फेरी:
साई एफसी: 1(शुभम रोंदल 48मि.) वि.वि.नवमहाराष्ट्र एफसी: 0;
दुर्गा एफसी: 2(मयुर वाघेरे 25मि., अमन मधुरे 48मि. नेल्सन पार्टे 58मि.) वि.वि.केशव माधव प्रतिष्ठान (केएमपी) इलेव्हन: 1(श्रीनिवास हसबेल 20मि.);
सिटी एफसी: 2(अथर्व रेवलकर 20मि., ललित पाटील 62मि.)वि.वि.राहुल फुटबॉल अकादमी: 1(आयुष वर्मा 32मि).