पुणे, ३ जानेवारी २०२३: शहर भारतीय जनता पार्टीचे मध्यवर्ती कार्यालय म्हात्रे पुलाजवळील डी.पी. रस्त्यावर स्थलांतरित करण्यात आले असल्याची माहिती पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
घाटे म्हणाले, नूतन कार्यालयाच्या शुभारंभाच्या निमित्ताने सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक, सहकार, पत्रकारिता, प्रशासन आदी क्षेत्रांतील मान्यवरांना येत्या रविवारी (दिनांक ७ जानेवारी) दुपारी ४ ते रात्री १० या वेळेत स्नेह-मेळाव्यासाठी निमंत्रित करण्यात आले आहे.
या स्नेहमिलानासाठी उपमुख्यमंत्री देवेन्द्रजी फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे तसेच ना. चंद्रकांतदादा पाटील यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
नूतन कार्यालयात एक मोठे सभागृह, अध्यक्षीय दालन, पदाधिकाऱ्यांसाठी स्वतंत्र दालने, कॉन्फरन्स रूम, वॉर रूम यांची व्यवस्था केलेली आहे.
कार्यालयात येणाऱ्या नागरिकांसाठी स्वागत कक्ष आणि पुरेशी बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. वर्तमान युग हे माहिती व तंत्रज्ञानाचे असल्याने आणि माहितीचे आदान-प्रदान सुलभ व्हावे, प्रभावी जनसंपर्क करता या उद्देशाने अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून यंत्रणा उभारण्यात आली असल्याचे घाटे यांनी सांगितले.
पुणे शहरातील भारतीय जनसंघाचे कार्यालय सर्वप्रथम पुण्याचे ग्रामदैवत तांबडी जोगेश्वरी मंदिराच्या शेजारी असलेल्या भिडे वाड्यातील एका छोट्या खोलीत सुरू झाले. १९८३ साली भिडे वाड्याचे नूतनीकरण होऊन त्याच ठिकाणी दुसऱ्या मजल्यावरील नवीन जागेत कार्यालय स्थलांतरित झाले. तेव्हापासून २०१७ पर्यंत पुणे शहर भाजपाचे सर्व कामकाज तेथूनच चालू होते. काळाची गरज म्हणून सन २०१६ मध्ये जंगली महाराज रस्त्यावरील हॉटेल सन्मान येथे मध्यवर्ती कार्यालय हलविण्यात आले.
परंतु ती ही जागा अपुरी पडू लागल्याने महानगरपालिका भवनाच्या जवळील जागेत ३ डिसेंबर २०२१ रोजी पुन्हा एकदा कार्यालय स्थलांतरित केले.
काळाच्या ओघात भाजपाच्या कामाची व्याप्ती सतत वाढत गेल्याने पुणे मनपा जवळील कार्यालय अजून मोठ्या जागेत आणि पार्किंग व्यवस्था मुबलक असलेल्या ठिकाणी स्थलांतरित करणे क्रमप्राप्त झाले. त्यामुळे शहराचे मध्यवर्ती कार्यालय नव्या वास्तूत स्थलांतरीत करीत आहोत, अशी माहिती घाटे यांनी दिली.
More Stories
Pune: मुळा-मुठेला प्रदूषणातून सुटका? मंजूर झाला तब्बल ८४२ कोटींचा मेगा प्लॅन
Pune: वसतिगृह स्थलांतरामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय
Pune: पीएमआरडीएतील सेवा सुविधा नागरिकांसाठी ऑनलाईन