September 24, 2025

अध्ययन अक्षमता असणाऱ्या मुलांच्या शारीरिक क्षमतेपेक्षा अंतरंग क्षमतांचा विकास महत्त्वाचा

पुणे, दि. ८ जानेवारी २०२४: अध्ययन अक्षमता असणाऱ्या मुलांच्या शैक्षणिक प्रगतीच्या आव्हाने व समस्यांना सामोरे जाताना, शारीरिक कमतरतेपेक्षा मुलांच्या अंतरंग क्षमतांचा पुरेपूर विकास आणि वापर कसा करता येईल, याकडे लक्ष देणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन योग इनिशिएटिव्ह सेंटर अॅट चिरंजीव फाऊंडेशनच्या संचालिका डॉ. सुनंदा राठी यांनी शनिवारी केले. योग शास्त्रातील अनेक सूत्रे आणि मार्गदर्शन यासाठी पथदर्शक आहे, असेही त्यांनी सांगितले.

कावेरी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या कावेरी एम्पॉवरमेंट सेलतर्फे आयोजित मार्गदर्शन सत्रात त्या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. गायडिंग स्टार्स – पेरेंट्स एम्पॉवरिंग जर्नी, या नावाने अध्ययन अक्षमता असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांच्या मार्गदर्शनासाठी सुरू केलेल्या उपक्रमांचा हा एक भाग होता. याप्रसंगी कन्नड संघाच्या सचिव आणि आयटीएस अंजली माॅरिस फाऊंडेशनच्या संचालिका मालती कलमाडी, कावेरी कौन्सेलिंग एम्पॉवरमेंट अँड गिफ्टेड सेंटरच्या सहाय्यक संचालिका डॉ. देवसेना देसाई, आयटीएस अंजली मॉरिस ट्रस्टच्या स्वप्ना दामेरला, केएचएसजीच्या प्राचार्या पल्लवी नाईक, सत्येन खाशू आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. अध्ययन अक्षमता असणाऱ्या मुलांच्या पालकांचीही उपस्थिती होती. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलन करून उपक्रमाची सुरवात करण्यात आली.

डॉ. राठी म्हणाल्या, अध्ययन अक्षमता असणाऱ्या मुलांच्या पालकांनी आणि अर्थात समाजानेही त्यांचा स्वीकार करणे महत्त्वाचे आहे. योगशास्त्रातील पंचकोश संकल्पना अशा मुलांच्या शारीरिक, मानसिक, भावनिक, बौद्धिक आणि आध्यात्मिक स्तरावर पालकांनी अवगत करून घेतली तर, या मुलांच्या फक्त शारीरिक किंवा बाह्य स्वरूपाकडे लक्ष केंद्रित न करता, ते त्यांच्या अंतरंग क्षमतांकडे वळेल आणि तेव्हाच आपण अशा मुलांचा केवळ विद्यार्थी म्हणून नव्हे, तर माणूस म्हणून विकास करू शकू. योगशास्त्रातील सोप्या, छोट्या सूत्रांमध्ये चमत्कार वाटावा, अशी सूत्रे आहेत. त्यांचा सराव पालकांनी स्वतः करणे आणि मुलांकडून करवून घेणे महत्त्वाचे आहे. डॉ. राठी यांनी काही सोप्या कृतींचे प्रात्यक्षिकही दाखवले.

स्वप्ना दामेरला म्हणाल्या, अध्ययन अक्षमता असणाऱ्या मुलांच्या बाबतीत पालकांसह समाजाच्या प्रत्येक घटकाने सकारात्मक दृष्टी जपली पाहिजे. त्यांच्यामध्ये सतत शिकण्याची उर्मी जागवणे, ती वाढवत नेणे या क्रमानेच विकास शक्य आहे. कोणत्याही प्रकारचा पूर्वग्रहदूषित दृष्टीकोन या मुलांच्या प्रगतीसाठी अडथळा ठरतो, असेही त्यांनी सांगितले.

प्राचार्या पल्लवी नाईक यांनी केस स्टडीचे उदाहरण देत कुठल्याही परिस्थितीत, या मुलांच्या क्षमतांचा शोध घेत राहणे सुरू ठेवले पाहिजे, असे मत मांडले. त्यांच्यातील क्षमता जागवणे, त्यांचा विकास करण्यासाठी उपक्रमांत गुंतवणे, हे शिक्षक आणि पालकांचे काम आहे. अशा मुलांच्या भाषिक, संख्याशास्त्रीय, गणिती, वैज्ञानिक जाणिवा जागृत करण्यासाठी असे पालक पाठिंबा समूह प्रत्येक शाळांनी सुरू करावेत, असेही त्या म्हणाल्या.

प्रास्ताविकात मालती कलमाडी यांनी अध्ययन अक्षमता असणाऱ्या मुलांच्या सुप्त क्षमता ओळखणे, त्या विकसित करणे, त्यासाठी मुलांना आणि पालकांना, तसेच शिक्षकांना मार्गदर्शन करणे, हा या उपक्रमाचा उद्देश असल्याचे स्पष्ट केले. मुले दिवसातील सर्वाधिक वेळ शाळांमध्ये असतात. हे लक्षात घेऊन कावेरी ग्रुप आप इन्स्टिट्यूटने शाळेच्या स्तरावर हा उपक्रम सुरू केला आहे, असे त्या म्हणाल्या. सत्येन यांनी उपस्थितांना एकत्र करून, आध्यात्मिक आशय असलेल्या गीतांचे सादरीकरण केले, ज्याचा आनंद उपस्थितांनी घेतला. डॉ. देवसेना देसाई यांनी आभार मानले. प्रवदा नायर यांनी सूत्रसंचालन केले.

पेरेंट सपोर्ट ग्रुप काय आहे
अध्ययन अक्षमता असणाऱ्या मुलांच्या पालकांसाठी, अशा मुलांचे शिक्षण नियमित विद्यार्थ्यांच्या सोबतीनेच आनंददायी आणि सर्वसमावेशक कसे करता येईल, याचे मार्गदर्शन पालकांसाठी निमयितपणे उपलब्ध करणारी ही सहायक यंत्रणा आहे. दर महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी कावेरी स्कूल, केतकर रस्ता येथे ही मार्गदर्शन सत्रे होणार आहेत. या सत्रांच्या माध्यमातून या मुलांचे पालक त्यांना जाणवणारी आव्हाने, समस्या तसेच अनुभवांची देवाणघेवाण करू शकतील. या विशेष एम्पावरमेंट सेलमध्ये सुहासिनी कुलकर्णी, शमा महाजन, शमिका कुलकर्णी, मैथिली कडेकर, प्रवदा नायर या तज्ज्ञ मार्गदर्शनासाठी उपलब्ध असतील.