September 24, 2025

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि रामकुमार राठी ग्रुप यांच्यात सामंजस्य करार, योग संशोधन केंद्र स्थापन करणार

पुणे, ०८/०१/२०२४: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि योग संशोधनासाठी आणि प्रचारासाठी प्रसिद्ध असलेल्या रामकुमार राठी समूह यांच्यात सोमवारी सामंजस्य करार करण्यात आला. या करारांतर्गत योग संशोधन केंद्रांची स्थापना करण्यात येणार आहे. या केंद्राद्वारे योगामुळे होणाऱ्या आरोग्यातील सुधारणांचे पुराव्यानिशी संशोधन करण्यात येणार आहे. याप्रसंगी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.(डॉ.) सुरेश गोसावी, आयुष मंत्रालयातील राष्ट्रीय संशोधन प्राध्यापक प्रा.भूषण पटवर्धन, राठी समूहाचे संचालक श्री राहुल राठी, न्यूयॉर्क विद्यापीठाचे प्राध्यापक रघु सुंदरम, प्र-कुलगुरू प्रा.(डॉ.) पराग काळकर, प्रभारी कुलसचिव प्रा.(डॉ.) विजय खरे, विद्यापीठाच्या अंतर्गत गुणवत्ता सिद्धता कक्षाचे संचालक प्रा.(डॉ.) संजय ढोले, आरोग्य विज्ञान विभागाचे प्रमुख डॉ. अभय कुदळे, आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना, योग जागतिक स्तरावर स्वीकारला गेला आहे. रामकुमार राठी ग्रुप सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नेतृत्वाखाली योग संशोधन आणि यासंबंधी शैक्षणिक उपक्रमांना पाठिंबा देणार असल्याचे राठी समूहाचे संचालक श्री राहुल राठी म्हणाले. या सामंजस्य करारांतर्गत शिक्षण आणि प्रशिक्षण (उदा. ऑनलाइन आणि ऑफलाइन अभ्यासक्रम, नोकरी-प्रशिक्षण, इंटर्नशिप), सेवा (उदा. एकात्मिक आरोग्य सल्ला, समुदाय विस्तार आणि आउटरीच), ट्रान्सडिसिप्लिनरी संशोधन प्रकल्प, विविध आंतरराष्ट्रीय पुरस्कार, प्रकाशने, विविध आउटरीच आणि विस्तार कार्यक्रम यावर विशेष लक्ष देण्यात येणार आहे. तसेच या सामंजस्य करारामध्ये शैक्षणिक, संशोधन आणि सरावासाठी कायमस्वरूपी इमारत आणि एक समिती स्थापन करण्यासह विविध उपक्रमांची रूपरेषा देण्यात आली आहे. या उपक्रमांमुळे संशोधक, विद्यार्थी आणि प्रॅक्टिशनर्सना फायदा होईल अशी अपेक्षा आहे.