September 24, 2025

गुजरात जायंटसचा पुणेरी पलटण संघाकडून धुव्वा

जयपूर, 12 जानेवारी 2024: दहाव्या प्रो कबड्डी लीग स्पर्धेत पुणेरी पलटण संघाने तुफानी खेळ करताना गुजरात जायंटस संघाचा 37-17 असा धुव्वा उडवताना गुण तालिकेत अव्वल स्थानाला साजेशी कामगिरी केली.
एसएमएस इंडोर स्टेडियम झालेल्या या लढतीत असलम इनामदार (10गुण), गौरव खत्री (6गुण) आणि मोहम्मद रेजा चियानेह(5गुण) यांनी पुणेरी पलटण कडून चमकदार कामगिरी केली.
बचावफळीच्या उत्कृष्ट कामगिरी मुळे गुजरात जायंटस पहिल्या पाच मिनिटात केवळ एक गुण नोंदवता आलं तर, वेगवान प्रारंभ करणाऱ्या पुणेरी पलटण संघाने पाच गुणांची झटपट आघाडी घेताना मिळवलेली पकड कायम राखली.
पूर्वार्धात आठ पकडी करून वर्चस्व गाजवनाऱ्या पुणेरी पलटण संघाने मध्यंतराला केवळ तीन मिनिटे बाकी असताना गुजरात जायंटस संघावर पहिला लोन चढवला. पाठोपाठ सलग पकडी करताना त्यांनी मध्यंतराला 11 गुणांची आघाडी मिळवली.
उत्तरार्धातही पुणेरी पलटण संघाने आपला धडाका कायम राखला. चार मिनिटातच दुसरा लोन चढवताना गुजरात जायंटस वर 28-20 अशी आघाडी घेतली.
आपली प्रतिष्ठा वाचवण्यासाठी धडपणाऱ्या जायंटस संघाने अखेरच्या सत्रात सलग सुपर टॅकल करून काहीशी झुंज देण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यामुळे निकालात फरक पडणार नव्हता. पुणेरी पलटण संघाने गुजरात जायंटसचा 20गुणांनी विजय मिळवून आगेकूच केली.