September 24, 2025

विद्यापीठात ‘महाराष्ट्राचा बौद्ध वारसा’वर तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषद

पुणे, 16 जानेवारी 2023- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ‘महाराष्ट्राचा बौद्ध वारसा’ या विषयावर तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. कुलगुरू प्रा.(डॉ.) सुरेश गोसावी यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्धाटन भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयातील बौद्ध आणि तिबेटी संस्थेचे संचालक डॉ. निरज कुमार यांच्या हस्ते होणार आहे. तर थायलंडच्या चुलालोंगकॉर्न विद्यापीठाचे प्रा. भद्रा रुजीरथत हे प्रमुख व्याख्याते म्हणून उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला प्र-कुलगुरू प्रा.(डॉ). पराग काळकर, प्रभारी कुलसचिव प्रा.(डॉ). विजय खरे, पाली व बुद्धीष्ठ स्टडीजचे विभाग प्रमुख डॉ. महेश देवकर उपस्थित राहणार आहेत.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्व आणि वस्तुसंग्रहालय विभाग यांच्या संयुक्त विद्यामाने या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. भारताच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ही परिषद घेण्यात येत आहे. १८ ते २० जानेवारी रोजी सकाळी १० ते ६ वाजता विद्यापीठाच्या नामदेव सभागृहात ही परिषद आयोजित करण्यात आली आहे. या आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्दिष्ट महाराष्ट्रातील बौद्ध वारसा आणि व्यापारी, कारागीर, सामान्य लोकांमध्ये बौद्ध विचारांच्या प्रसारामध्ये काय भूमिका आहे याचा शोध घेणे आहे. या परिषदेत बौद्ध संस्कृतीसह बौद्ध वारसा संवर्धन, ऐतिहासिक नोंदी, मजकूर स्रोत, पुरातत्वीय अवशेष इत्यादींवर तीन दिवस चर्चा होणार आहे. तसेच या परिषदेत ६ आंतरराष्ट्रीय आणि १९ राष्ट्रीय संशोधक आपले शोधनिबंध सादर करणार आहेत.