पुणे, दि. १८ जानेवारी २०२४ : ज्यांनी रंगभूमीवर हयात वेचली, अशा रंगकर्मींच्या नावाने अगदी तुरळक नाट्यगृहे दिसतात. पण राजकीय नेत्यांच्या नावाने मात्र अनेक नाट्यगृहे आहेत, असे का? असा प्रश्न ज्येष्ठ रंगकर्मी आणि अभिनेते नसिरुद्दीन शाह यांनी केला. महाराष्ट्र कल्चरल सेंटर आणि लागू परिवार यांच्या वतीने उभारण्यात आलेल्या पुण्यातील श्रीराम लागू रंग – अवकाश या प्रकल्पाचे औपचारिक उद्घाटन आज ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह यांच्या हस्ते संपन्न झाले, त्यावेळी ते बोलत होते. टिळक रस्त्यावरील हिराबाग चौक येथील ज्योत्स्ना भोळे सभागृह इमारतीच्या पहिला मजल्यावर हा प्रकल्प उभारण्यात आला आहे.
डॉ श्रीराम लागू यांच्या पत्नी दीपा लागू, मुलगा डॉ आनंद लागू, महाराष्ट्र कल्चरल सेंटरचे अध्यक्ष डॉ मोहन आगाशे, कार्याध्यक्ष एस पी कुलकर्णी, सुप्रसिद्ध अभिनेत्री रत्ना पाठक शाह आदी मान्यवर यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते. सेंटरचे सचिव राजेश देशमुख, खजिनदार शुभांगी दामले, सभासद व अनेक कलाकार मंडळी देखील याप्रसंगी उपस्थित होती.
यावेळी बोलताना नसीरुद्दीन शाह म्हणाले, “राजकीय नेत्यांच्या नावे नाट्यगृहे, हे केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशभरातील चित्र आहे. गिरीश कर्नाड, शंभू मित्रा, तन्वीर हबीब, पं. सत्यदेव दुबे कुणाच्याही नावाने थिएटर नाही, ही वस्तुस्थिती एक रंगकर्मी म्हणून मला खटकते. रंगभूमीच्या जन्मस्थानी महाराष्ट्रात फक्त बालगंधर्व आणि डॉ. घाणेकर यांचे अपवाद वगळता रंगकर्मींच्या स्मृतींचे थिएटर नाही.”
पुण्यात मात्र आज डॉ. लागू यांच्या नावाने हा नवा रंग अवकाश सुरू झाला आहे, त्याचे उद्घाटन करण्याची संधी मला मिळाली, याने मी सन्मानित झालो आहे. हा नवा रंग – अवकाश म्हणजे रंगकर्मींचे दुसरे घर होवो, असेही ते म्हणाले.
“डॉ. लागू यांचे काम राष्ट्रीय नाट्य विद्यालयात शिकत असताना प्रथम पाहिले. १९७१ चा तो काळ होता. ‘आधेअधुरे’ या नाटकातील त्यांचे काम पाहून माझा श्वास थांबला की काय, असे वाटत होते. आवाजाचा लवचिक वापर, डोळ्यातले भाव, सहजता, भावनांवरील कमालीचे नियंत्रण… सर्वच विलक्षण होते. मी त्यांची ‘गिधाडे’, ‘कस्तुरीमृग’, ‘सूर्य पाहिलेला माणूस’ ही नाटके तसेच ‘सामना’ हा चित्रपट पाहिला. मी असे काम कधी करू शकेन का, असा प्रश्न स्वतःला विचारला आणि ‘नाही’ असे उत्तर मिळाले. पण नकळत एकलव्याप्रमाणे मी त्यांच्याकडून खूप शिकत राहिलो, असेही नसीरुद्दीन शाह म्हणाले.
डॉ. मोहन आगाशे म्हणाले, “नव्या रंगकर्मीसाठी अनुकूल परिस्थिती भोवताली नसताना हा नवा रंग अवकाश उपलब्ध होत आहे, ही आमच्यासाठी समाधानाची आणि आनंदाची बाब आहे. स्वतः नसीरुद्दीन शाह आपल्या नाट्यप्रयोगाने या रंग अवकाशाची सुरुवात करत आहेत, यासारखे औचित्य नाही.” श्रीराम लागू आणि नसीरुद्दीन शाह यांना बदलत्या युगातील ‘थिएटर लॉयलिस्ट’ म्हणता येईल असे सांगत डॉ आगाशे पुढे म्हणाले, “श्रीराम लागू आणि नसीरुद्दीन शाह या दोघांनी कितीही इतर गोष्टी केल्या तरी त्यांचे संपूर्ण मन हे केवळ थिएटर मध्येच आहे. डॉ लागू यांनी शेवटपर्यंत रंगभूमीवर काम केले तर कोणत्याही प्रलोभनांना बळी न पडता नसीरुद्दीन अजून कार्यरत आहे. आज याच थिएटरच्या कामासाठी हे दोघे एकत्र आले आहेत हा दुर्मिळ आणि आनंदी योग आहे.” आज यांच्यासारख्या कलाकारांच्या प्रजाती या नष्ट होत चालल्या आहेत, असेही डॉ आगाशे यांनी सांगितले.
डॉ आनंद लागू यांनी यावेळी श्रीराम लागू रंग – अवकाशचे महत्त्व विशद करीत हे उभारण्यामागील कल्पना सांगितली. शुभांगी दामले यांनी सुदर्शन रंगमंच, जोत्स्ना भोळे सभागृह ते ‘ब्लॅक बॉक्स’ या संकल्पनेवर आधारित श्रीराम लागू रंग – अवकाशाचा प्रवास विशद केला. राजेश देशमुख यांनी निवेदन केले तर किरण यज्ञोपवीत यांनी आभार मानले.
More Stories
तळेगाव–चाकण–शिक्रापुर राष्ट्रीय महामार्ग दुरुस्ती व रुंदीकरणासाठी Rs ५९.७५ कोटी निधीस मान्यता
Pune: मुळा-मुठेला प्रदूषणातून सुटका? मंजूर झाला तब्बल ८४२ कोटींचा मेगा प्लॅन
Pune: वसतिगृह स्थलांतरामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय