September 24, 2025

म्हसोबा गेट ते कृषी महाविद्यालय अंतर्गत रस्ता खुला होणार – आमदार सिद्धार्थ शिरोळे

पुणे, 20 जानेवारी 2023- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ मार्गावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी म्हसोबा गेट ते कृषी महाविद्यालयाचा अंतर्गत रस्ता खुला करण्यास पालकमंत्री अजित पवार आणि अधिकाऱ्यांबरोबर झालेल्या बैठकीत तत्वतः मान्यता देण्यात आली, असे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी सांगितले.

वाहतूक पोलीसांशी संपर्क साधल्यानंतर सिंचन नगर (भोसलेनगर) हा मार्ग लवकरच दिवसभरासाठी खुला केला जाईल. या नवीन मार्गामुळे डेक्कन/एफसी रोडवरून भोसलेनगर, खडकी, बोपोडी आणि औंधकडे जाणाऱ्या २ आणि ४ चाकी वाहनांची सोय होईल, या पर्यायी रस्त्यामुळे प्रवासाच्या वेळेत लक्षणीय कपात होईल आणि पुणे विद्यापीठ सर्कल आणि लगतच्या रस्त्यांभोवतीची गर्दी कमी होईल, असे आमदार शिरोळे यांनी सांगितले.

कृषी महाविद्यालय वाहतुकीसाठी सर्वांना खुले करण्याचा निर्णय आम्ही येत्या काही आठवड्यांत अंमलात आणत असलेल्या अनेक बदलांपैकी एक आहे. पुणे विद्यापीठ मार्ग आणि लगतच्या भागातील गर्दी कमी करून नागरिकांची गैरसोय लक्षणीयरीत्या कमी करणे या दृष्टीने निर्णय घेतले जात आहेत, असेही आमदार शिरोळे यांनी सांगितले.

ऑगस्ट २०२४ पर्यंत विद्यापीठ चौकातील उड्डाणपुलाचे बांधकाम पूर्ण केले जाईल असे आश्वासन सबंधित अधिकारी व भागधारकांनी दिलेले आहे, अशी माहिती त्यांनी दिली.