September 24, 2025

एल अॅण्ड टी मुंबई ओपन डब्लूटीए १लाख २५हजार डॉलर टेनिस स्पर्धेत भारताच्या श्रीवल्ली रश्मिका भामीदिप्तीचा मुख्य फेरीत प्रवेश

मुंबई ४ फेब्रुवारी २०२४: महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना (एमएलटीए) आणि क्रिकेट क्लब ऑफ इंडिया (सीसीआय) आयोजित एल अॅण्ड टी मुंबई ओपन डब्लूटीए १लाख २५हजार डॉलर टेनिस स्पर्धेत अंतिम पात्रता फेरीत भारताच्या श्रीवल्ली रश्मिका भामीदिप्ती हिने सुरेख खेळ करत मुख्य फेरीत प्रवेश केला.
 
क्रिकेट क्लब ऑफ इंडिया येथील टेनिस कोर्टवर सुरू असलेल्या या स्पर्धेत अंतिम पात्रता फेरीत २२ वर्षीय वाईल्ड कार्ड द्वारे प्रवेश केलेल्या भारताच्या श्रीवल्ली रश्मिका भामीदिप्ती हीने स्लोवाकियाच्या व्हिक्टोरिया मोर्वायोवाचा ६-३, ३-६, ६-३ असा तीन सेटमध्ये पराभव करून मुख्य फेरी गाठली. पात्रता फेरीतून मुख्य फेरीत प्रवेश करणारी श्रीवल्ली एकमेव भारतीय खेळाडू ठरली. श्रीवल्ली हिने नोव्हेंबरमध्ये आयटीएफ स्पर्धेत याआधी विजेतेपद पटकावले होते. पहिल्या सेटमध्ये श्रीवल्लीने सुरेख खेळ करत व्हिक्टोरियाविरुद्ध ६-३ असा जिंकून आघाडी घेतली. दुसऱ्या सेटमध्ये व्हिक्टोरियाने वरचढ खेळ करत श्रीवल्ली विरुद्ध ६-३ असा जिंकून बरोबरी साधली. तिसऱ्या निर्णायक सेटमध्ये ५-३ अशा फरकाने आघाडीवर असताना श्रीवल्लीने नवव्या गेममध्ये व्हिक्टोरियाची सर्व्हिस ब्रेक केली व हा सेट ६-३ असा जिंकून विजय मिळवला. 
 
फ्रांसच्या नवव्या मानांकित अमनदिनी हासेने भारताच्या वाईल्ड कार्डद्वारे प्रवेश केलेल्या वैदेही चौधरीचा ६-३, ६-१ असा पराभव करून आगेकूच केली. इस्त्राईलच्या लीना ग्लूशको हिने अकराव्या मानांकित इटलीच्या कॅमिला रोसटेलोचे आव्हान ६-३, ६-३ असे मोडीत काढले. हंगेरीच्या सहाव्या मानांकित फॅनी स्टोलरने कोरियाच्या दहाव्या मानांकित सोहयुन पार्कला ६-३, ६-४ असे पराभूत केले.  थायलंडच्या पेंगतारण प्लीपुचने तैपेईच्या चिया यि साओचा ६-३, ६-३ असा पराभव करून मुख्य फेरीत धडक मारली. 
 
 निकाल:अंतिम पात्रता फेरी:
हिमेनो साकात्सुमे (जपान)(१) वि.वि.झील देसाई(भारत) ७-५, सामना सोडून दिला; 
श्रीवल्ली रश्मिका भामीदिप्ती (भारत)वि.वि.व्हिक्टोरिया मोर्वायोवा (स्लोवाकिया)६-३, ३-६, ६-३; 
लीना ग्लूशको(इस्त्राईल)वि.वि.कॅमिला रोसटेलो(इटली)(११)६-३, ६-३;
अमनदिनी हासे (फ्रांस)(९)वि.वि.वैदेही चौधरी (भारत) ६-३, ६-१; 
फॅनी स्टोलर(हंगेरी)(६)वि.वि. सोहयुन पार्क(कोरिया)(१०)६-३, ६-४; 
पेंगतारण प्लीपुच (थायलंड) वि.वि. चिया यि साओ(तैपेई)६-३, ६-३; 
 
एकेरीतील खेळाडूंची मानांकन यादी खालीलप्रमाणे: 
१. कायला डे(अमेरिका), २.नाओ हिबिनो(जपान), ३. तमारा झिदानसेक(स्लोव्हाकिया), ४.अरिना रोडिनोव्हा(ऑस्ट्रेलिया), ५.लौरा पिगोसी(ब्राझील), ६.दरजा सेमेनिस्तजा(लात्विया), ७. किंबर्ली बायरेईल(ऑस्ट्रेलिया), ८.कॅटी वॉलनेट्स(अमेरिका);