पुणे, दि. १५ फेब्रुवारी, २०२४: तत्कालीन रंगभूमी गाजवणारे सर्व लोकप्रिय रंगकर्मी मोठ्या संख्येने स्वतःहून सहभागी होत असूनही, नाट्यदर्पण रजनी हा ‘इव्हेंट’ झाला नाही. त्यातील गुणवत्ता, कल्पकता, आशयाची श्रीमंती यामुळे हे शक्य झाले, असे गौरवोद्गार ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांनी काढले.
१९७५ ते १९९९ या २५ वर्षांत रसिकांनी डोक्यावर घेतलेल्या ‘नाट्यदर्पण रजनी’ या कार्यक्रमाच्या आठवणींना उजाळा देण्याच्या हेतूने पुण्यातील हिंदू महिला सभेच्या वतीने ‘स्मरण नाट्यदर्पण रजनीचे’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.
नाट्यदर्पण रजनी हा कार्यक्रम थांबून २५ वर्षे झाली आहेत. हेच औचित्य साधत आणि कार्यक्रमाची धुरा सांभाळणारे सुधीर दामले व जयश्री दामले यांना आदरांजली वाहण्याच्या हेतूने नाट्यदर्पण परिवाराच्या शुभांगी दामले यांच्या सहकार्याने सदर कार्यक्रम एम. ई. एस सभागृह, मयूर कॉलनी, कोथरूड येथे रसिकांच्या तुडुंब गर्दीत संपन्न झाला.
ज्येष्ठ नाटककार सुरेश खरे, ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे, ज्येष्ठ अभिनेते, गायक चंद्रकांत काळे, ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे, गायिका आरती अंकलीकर टिकेकर, शैला दातार, राजीव जोशी, प्रमोद लिमये आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. सर्व मान्यवरांचा हिंदू महिला सभेच्या अध्यक्ष सुप्रिया दामले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी प्रास्ताविक करताना सुप्रिया दामले म्हणाल्या, “अभिनेते गणेश सोळंकी यांच्या संकल्पनेतून आणि सुधीर दामले यांच्या आयोजनामुळे १९७५ ते १९९९ या २५ वर्षात नाट्यदर्पण रजनीचे अनेक उपक्रम झाले. दोन हजाराहून अधिक कलावंतांनी आपली कला या कार्यक्रमात सादर केली. यामध्ये अनेक कलावंतांच्या उत्तम कलाकृतींचा सहभाग होता. त्या सोनेरी कालखंडातील निवडक कार्यक्रमांचे दृकश्राव्य स्मरणरंजन रसिकांसमोर यावे, असे वाटल्याने या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे”. नाट्यदर्पण परिवाराच्या सदस्य आणि ज्येष्ठ अभिनेत्री शुभांगी दामले यांच्या सहकार्यामुळे हा सगळा २५ वर्षांचा अमूल्य ठेवा आपल्याला अनुभवणे शक्य झाल्याचेही त्यांनी सांगितले.
शुभांगी दामले यांनी नाट्यदर्पण रजनीची सुरवात, त्यामागील उद्देश, त्यासाठी सुधीर दामले आणि जयश्री दामले तसेच त्यांच्या टीमने केलेली अविश्रांत मेहनत, कल्पक संयोजन आणि सर्व रंगकर्मींशी असलेला जिव्हाळा याविषयीच्या आठवणींना उजाळा दिला.
ज्येष्ठ नाटककार सुरेश खरे म्हणाले, “नाट्यदर्पण रजनीसाठी अनेक संहिता लिहिल्या, उपक्रम सुचवले, सादर केले. दामले काकांनी पूर्ण स्वातंत्र्य दिले आणि मी म्हणेन तो कलाकार मला मिळवून दिला. नाट्यदर्पणचा उपक्रम ज्या दिवशी असेल, त्या दिवशी कुणीही कलाकार, निर्माता नाटकाचे प्रयोग लावत नसत, ही दाद फार मोठी होती.”
अभिनेत्री आशा काळे म्हणाल्या, “केवळ दामलेकाकांच्या आग्रहामुळे ‘वाहतो ही दुर्वांची जुडी’ या प्रयोग थांबविलेल्या नाटकातील प्रवेश मी सादर करू शकले. त्यातून माझ्यासाठी अनेक संधी निर्माण झाल्या.”
मा. कृष्णराव यांच्या जन्मशताब्दीनिमित्त दामले यांनी मला नाट्यपदांचा मिडले करण्याची अनोखी संधी दिल्याचा उल्लेख शैला दातार यांनी केला. आरती अंकलीकर टिकेकर म्हणाल्या, “कारकिर्दीच्या अगदी सुरवातीच्या काळात दामले यांनी मला नाट्यदर्पण रजनीमध्ये गायनाची संधी दिली. तेव्हा मिळालेली स्मृतीचिन्हे मी आजही जपून ठेवली आहेत.”
दामले ही माझ्यासाठी नियती होती, इतक्या संधी त्यांनी मला दिल्या’, अशी कृतज्ञ भावना राजीव जोशी यांनी व्यक्त केली. सतत २५ वर्ष मी दामले यांच्यामुळे नाट्यदर्पणशी जोडलेला राहिलो, अशी आठवण प्रमोद लिमये यांनी जागवली. चंद्रकांत काळे म्हणाले, “मी थिएटर अकादमीचा कलाकार. पण व्यावसायिक रंगभूमीशी संबंधित असूनही दामले यांनी माझी दखल घेतली. ‘महानिर्वाण’, ‘बेगम बर्वे’ आणि ‘ही प्रीत राजहंसी’ या माझ्या तीनही नाटकांना त्यांनी पुरस्कार दिले.”
नाट्यदर्पण रजनीचे कार्यक्रम दृकश्राव्य स्वरूपात संपादित करून त्यातील काही भाग याप्रसंगी रसिकांसमोर खुला करण्यात आला. संगीत रंगभूमीवरील ज्योत्स्ना भोळे, जयमाला शिलेदार, छोटा गंधर्व, प्रकाश घांग्रेकर, रामदास कामत, कीर्ती शिलेदार अशा अनेक मान्यवरांचे गायन, गजाननराव वाटवे, सुधीर फडके, माणिक वर्मा, अरुण दाते, शोभा गुर्टू, सुधा मल्होत्रा, सुहासिनी मुळगावकर अशा अनेक गायक कलावंतांचे सादरीकरण, विजया मेहता, भक्ती बर्वे, दिलीप प्रभावळकर, वसंत कानेटकर, राजा गोसावी, शरद तळवलकर, लक्ष्मीकांत बेर्डे, विजय कदम, आदेश बांदेकर असे अनेक कलाकार या दृकश्राव्य खजिन्याच्या माध्यमातून रसिकांना स्मरणरम्य काळात घेऊन गेले.
वंदना जोगळेकर यांनी सूत्रसंचालन केले तसेच हिंदू महिला सभेच्या कार्याची माहिती दिली.
More Stories
तळेगाव–चाकण–शिक्रापुर राष्ट्रीय महामार्ग दुरुस्ती व रुंदीकरणासाठी Rs ५९.७५ कोटी निधीस मान्यता
Pune: मुळा-मुठेला प्रदूषणातून सुटका? मंजूर झाला तब्बल ८४२ कोटींचा मेगा प्लॅन
Pune: वसतिगृह स्थलांतरामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय