September 25, 2025

महा ओपन एटीपी चॅलेंजर स्पर्धा खऱ्या अर्थाने अव्वल 100 मधील स्पर्धा

पुणे, १६ फेब्रुवारी २०२४: पुण्यामध्ये २०१४ मध्ये सुरु झालेल्या एटीपी चॅलेंजर स्पर्धेला चॅलेंजर दर्जा त्यामुळे प्राप्त झाला कि, या स्पर्धत केवळ भारतातीलच नव्हे तर जगभरातील अव्वल १०० खेळाडूंपैकी सर्वोत्तम खेळाडूंचा सहभाग होता. पहिली सहा वर्षे केपीआयटी एमएसएलटीए एटीपी चॅलेंजर या सलग पार पडलेल्या या स्पर्धेत कोविड मुळे तीन वर्षांचा खंड पडला. त्यानंतर महाराष्ट्र ओपन चॅलेंजर या नावाने या स्पर्धेने २०२३मध्ये पुनरागमन केले. या स्पर्धेचे महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटने(एमएसएलटीए)च्या वतीने आयोजन करण्यात आले होते.

स्पर्धेच्या प्रारंभापासून स्पर्धा संचालक म्हणून भूषविणारे एमएसएलटीएचे मानद सचिव सुंदर अय्यर आणि एमएसएलटीएचे चेअरमन प्रशांत सुतार यांनी सांगितले की, गेल्या कित्येक वर्षांपासून या स्पर्धेला अव्वल १०० चॅलेंजर स्पर्धांपैकी एक म्हणूनच ओळखले जाते. युकी भांब्रीने हि स्पर्धा दोन वेळा जिंकली, एकेरीत दोनदा विजेतेपद मिळवणारा तो एकमेव खेळाडू आहे. प्रजनेश गुन्नेस्वरन याने दोन वेळा तर रामकुमार रामनाथनने एकदा अंतिम फेरीत प्रवेश केला होता, अशाप्रकारे एकेरीत अव्वल १०० किंवा १२० खेळाडूंमध्ये स्थान मिळवण्याची आणि त्या जोरावर पुढच्या मौसमात अनेक प्रमुख स्पर्धा खेळण्याची संधी या स्पर्धेतील कामगिरीमुळे भारतीय खेळाडूंना मिळत असते.

या स्पर्धेद्वारे महत्वपूर्ण एटीपी गुण मिळवणाऱ्या भारतीय खेळाडूंबरोबरच या स्पर्धेतील माजी विजेता यूची सुगिता(जपान), सादिओ डोम्बिया(फ्रांस), एलियास यमेर(स्वीडन), जेम्स डाकवर्थ व मॅक्स पुरसेल(ऑस्ट्रेलिया) यांना देखील एकेरीत अव्वल १०० खेळाडूंमध्ये स्थान मिळवण्यासाठी हि स्पर्धा बहुमोल ठरली आहे.

भारतीय जोड्यांनी या स्पर्धेत सात पैकी पाचवेळा दुहेरीचे विजेतेपद पटकावले आहे. अनिरुद्ध चंद्रशेखर आणि विजय सुंदर या जोडीने हि स्पर्धा २०२३ मध्ये जिंकताना स्पर्धेचे महत्व दाखवून दिले. वाईल्ड कार्ड द्वारे स्पर्धेत प्रवेश मिळालेल्या या जोडीने मानांकन यादीत अव्वल १०० खेळाडूंमध्ये धडक मारली. या जोडीबरोबरच साकेत मायनेनी, सनम सिंग, दिविज शरण, पुरव राजा, रामकुमार रामनाथन व अर्जुन कढे यांनी दुहेरीत एक तर अंतिम फेरी गाठताना किंवा विजेतेपद पटकावताना आपल्या मानांकनात प्रगती करून अव्वल १०० खेळाडूंमध्ये स्थान मिळवले असल्याचे अय्यर यांनी नमूद केले.

यंदाच्या स्पर्धेत सुमित नागला याला अग्रमानांकन देण्यात आले असून अनेक भारतीय खेळाडूंनी पात्रता फेरीतून किंवा थेट मुख्य ड्रॉ मध्ये प्रवेश मिळवला असल्यामुळे हि स्पर्धा खऱ्या अर्थाने भारतीय खेळाडूंसाठी चॅलेंजर स्पर्धा ठरली आहे.तसेच, आणखी अनेक खेळाडूंना अव्वल १०० खेळाडूंमध्ये स्थान मिवण्याची संधी या स्पर्धेमुळे मिळणार आहे, असे अय्यर यांनी सांगितले.