पुणे, 19 फेब्रुवारी 2024: राज्यकर्त्यांकडे दोन गुण असणे आवश्यक असतात, ते म्हणजे तो प्रयोगशील आणि बदल स्विकारणारा असावा. हे दोन्ही गुण छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये होते. म्हणूनच आजही त्यांचे प्रशासन कौैशल्य सर्वोत्कृष्ट मानले जाते, असे प्रतिपादन ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. केदारनाथ फाळके यांनी केले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ‘ छत्रपती शिवाजी महाराजांची अर्थव्यवस्था’ या विषयावर ते बोलत होते. याप्रसंगी कुलगुरू प्रा.(डॉ) सुरेश गोसावी, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. नितिन घोरपडे, अधिसभा सदस्य श्रीमती मोहिते, अर्थशास्त्राचे विभाग प्रमुख डॉ. विलास आढाव, विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ. अभिजित कुलकर्णी, रासेयोचे संचालक डॉ. सदानंद भोसले, डॉ. सुनिल भंडगे, अधिसभा सदस्य मुकुंद पांडे, डॉ. राजेन्द्र घोडे आदी उपस्थित होते.
सुजलाम सुफलाम राष्ट्राची निर्मिती करायची असेल, प्रजा सुखी ठेवायची असेल तर अर्थव्यवस्था भक्कम असणे गरजेचे असते. शिवाजी महाराजांनी त्यांची दूरदृष्टी वापरुन प्रजेला कधीही हात न लावता त्यावेळी अर्थव्यस्था भक्कम केली होती, असेही डॉ. केदारनाथ फाळके यावेळी म्हणाले. शिवरायांनी आपली अर्थनीती ठरवताना स्वराज्यात पैसा कोणत्या मार्गाने येईल याचा खूप लांबचा विचार करून ठेवलेला होता. समुद्रमार्गे ही पैसा घेऊ शकतो हे त्यांनी आरमार उभे करून सिद्ध करून दाखवले. त्यावेळी महाराजांनी वसई पासून गोव्यापर्यंतची बंदर आपल्या ताब्यात घेऊन मीठाची निर्यात सुरू केली, असे करून त्यांनी आंतरराष्ट्रीय व्यापाराचा दार भारतीयांसाठी खुल केल असल्याचेही ते यावेळी म्हणाले. यावेळी डॉ. फाळके यांनी शिवाजीचे धैर्य, निष्कलंक चारित्र्य, तत्वांशी न केलेली तडजोड, महाराजांचे संघटन कौैशल्य, आरमाराची उभारणी व सत्तेचे विकेंद्रीकरण, मानवी संसाधन विकास, ऐक्य, स्थापत्य, वित्त व्यवस्था या सारख्या त्यांच्या अनेक पैलुवर प्रकाश टाकला. यावेळी कुलगुरू प्रा.(डॉ) सुरेश गोसावी यांनी उपस्थितांना शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या. सोमवारी सकाळी विद्यापीठातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला कुलगुरू प्रा.(डॉ) सुरेश गोसावी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यानंतर विद्यापीठात विद्यार्थ्यांद्वारे काढण्यात आलेल्या मिरवणूकीची पुतळ्याजवळ सांगता झाली. यावेळी विद्यार्थ्यांनी तलवारबाजी सारख्या पारंपारिक खेळाचे प्रात्यक्षिक सादर केले. शिवजयंती निमित्त राष्ट्रीय सेवा योजनेद्वारे वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेच्या विजेत्यांना यावेळी मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक प्रदान करण्यात आले. या कार्यक्रमाला व्यवस्थापन परिषदेचे सदस्य, विद्या परिषदेचे सदस्य, अधिसभा सदस्य, शैक्षणिक व प्रशासकीय विभागांचे विभागप्रमुख, शिक्षक, शिक्षकेतर सेवक, विविध संघटनांचे पदाधिकारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.

More Stories
Pune: अल्पकालीन उपाययोजना तातडीने अमलात आणा- मुरलीधर मोहोळ यांचे निर्देश
Pune: एमईए आंतरराष्ट्रीय बिझनेस एक्स्पो २०२६ चे आयोजन
Pune: पुण्यात पुन्हा फ्लेक्स भाषेचा सुळसुळाट प्रशासनाचे दुर्लक्ष