December 2, 2025

शास्त्रीय गायन आणि व्हायोलिन वादनाने रंगला सतार नवाज उस्ताद बाले खान संगीत महोत्सवाचा दुसरा दिवस

पुणे, दि. २५ जून, २०२४ : सुप्रसिद्ध संगीतकार, पार्श्वगायिका विदुषी संगीता कट्टी यांचे सुमधुर गायन, ख्यातनाम व्हायोलिनवादक पं. प्रविण शेवलीकर व चैताली शेवलीकर यांचे बहारदार व्हायोलिनवादन आणि पं. शौनक अभिषेकी यांच्या कसलेल्या गायनाने ६ व्या सतार नवाज उस्ताद बाले खान संगीत महोत्सवाचा दुसरा दिवस संस्मरणीय ठरला.

एरंडवणे येथील डॉ कलमाडी श्यामराव हायस्कूलच्या शकुंतला शेट्टी सभागृहात सदर दोन दिवसीय महोत्सव नुकताच संपन्न झाला. सुप्रसिद्ध सतारवादक छोटे रहिमत खाँ, सुहाना बसंत फाउंडेशनचे अध्यक्ष आणि सुप्रसिद्ध सतारवादक रईस खान यांसोबतच अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.

विदुषी संगीता कट्टी यांनी राग भीमपलासी सादर करीत आपल्या गायनाला सुरुवात केली. यामध्ये त्यांनी एक ताल मध्ये ‘ रे बिरहा बमना सगुण बिचारो…’ हा बडा ख्याल सादर केला. यानंतर त्यांनी ‘ रंग सो रंग मिलाये…’ हा एक तालमधील द्रुत ख्याल गायला. राग मधुवंतीमध्ये रूपक तालात ‘शिव आद महादेव…’ ही शिवस्तुती त्यांनी सादर केली. कन्नड भजन सादर करीत त्यांनी सर्वांची वाह वाह मिळविली. संत जनाबाई यांची ‘जनी जाय पाणियासी । मागें धांवे हृषिकेशी’ ही रचना प्रस्तुत करीत त्यांनी आपल्या गायनाचा समारोप केला. विदुषी संगीता कट्टी यांना भरत कामत (तबला), सुयोग कुंडलकर (संवादिनी), अश्विनी भुरे आणि भाग्यश्री बडवाईक (तानपुरा) यांनी साथसंगत केली.

यानंतर पं. प्रविण शेवलीकर व चैताली शेवलीकर यांचे व्हायोलिनवादन संपन्न झाले. त्यांनी राग यमनची बहारदार प्रस्तुती केली. त्यांना पं राजेंद्र नाकोड यांनी तबला तर श्रीनिधी कुलकर्णी यांनी तानपुरा साथ केली. ६ व्या सतार नवाज उस्ताद बाले खान संगीत महोत्सवाचा समारोप पं जितेंद्र अभिषेकी यांचे शिष्य व सुपुत्र पं शौनक अभिषेकी यांच्या गायनाने झाला. त्यांनी राग एकतालचे सादरीकरण केले. यामध्ये त्यांनी झुमरा तालात बडा ख्याल आणि द्रुत एकतालात बंदिश प्रस्तुत केली. राग अडाणा मध्ये रुपक तालात त्यांनी एक रचना सादर केली. आणि भैरवी रागातील अभंग प्रस्तुतीने त्यांनी आपल्या सादरीकरणाचा आणि महोत्सवाचा समारोप केला. पं शौनक अभिषेकी यांना भरत कामत (तबला), सुयोग कुंडलकर (संवादिनी), अभेद अभिषेली, राज शाह (गायन) यांनी साथसंगत केली. आनंद देशमुख यांनी महोत्सवाचे सूत्रसंचालन केले.