पुणे, २६ जुलै २०२४ः धरणातून पाणी सोडताना जलसंपदा आणि महापालिकेमध्ये समन्वय ठेवणे आवश्यक आहे. पुन्हा अशा दुर्घटना घडणार नाहीत याची काळजी घ्या. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून पंचनाम्यासाठी १६ पथके तयार करण्यात आले आहेत. नागरिकांना प्राथमिक स्वरूपात ५ ते १० हजार रुपयांची मदत केली जाईल, पूर्ण नुकसान भरपाई नंतर दिली जाईल, असे केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले.
खडकवासला धरणातून पाणी सोडल्याने शहरात सिंहगड रस्ता, वारजे, पाटील इस्टेट, पुलाची वाडी आदी भागातील सोसायट्या, वस्त्यांमध्ये पाणी घुसले होते. त्याची पाहणी केल्यानंतर मोहोळ यांनी आज शासकीय विश्रामगृह येथे महापालिका व शासनाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार माधुरी मिसाळ, भीमराव तापकीर, सिद्धार्थ शिरोळे, भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे, विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी सुहास दिवसे, महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्यासह जलपंसपदा, महावितरण, आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना मोहोळ म्हणाले, ‘‘शहर आणि जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने खडकवासला धरण साखळीत पाणी साठा वाढला आहे. त्यामुळे धरणामधून मोठ्या क्युसेसने पाणी सोडण्यात आले. विसर्ग वाढवत असताना पाटबंधारे विभागाने याची माहिती जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींसह महापालिका, महसूल, पोलिस प्रशानाला दिली पाहिजे. त्यामुळे नदी काठ परिसरातील नागरिकांना लवकर माहिती मिळू शकते. शासकीय विभागांमध्ये कोणताही समन्वय नसल्यामुळे नागरिकांचे मोठे नुकसान झाले. यापुढे अशी दुर्घटना घडणार नाही याची काळजी घ्यावी आणि यासाठी दोन्ही विभागाच्या अधिकाऱ्यांनी समन्वय असणे गरजेचे आहे.
शहरातील विविध भागात पाहणी केल्यानंतर आज शहरातील स्थितीचा आढावा घेण्यात आला आहे. नुकसान झालेल्या परिस्थितीचा पंचनामा करण्यासाठी दोन उपजिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून सोळा पथके तयार करण्यात आले आहेत. शहराच्या विविध भागात फिरून हे पथके पंचनामा करण्याचे काम सुरु केले आहे. प्राथमिक स्वरूपात पाच ते दहा हजार रुपयांची मदत देण्याबाबतही चर्चा करण्यात आली आहे. पंचनाम्याचे काम पूर्ण केल्यानंतर नुकसान भरपाई ही देण्यात येणार आहे. यासाठी विभागीय आयुक्त पुलकुंडवार यांनी शासनाकडे प्रस्ताव पाठवावा अशा सूचना मोहोळ यांनी दिल्या. तसेच ज्या भागातील विद्युत पुरवठा बंद केला आहे, तेथील वीज पुरवठा सुरु करावा, असेही मोहोळ यांनी सांगितले.

More Stories
सूर महती महोत्सवात रसिकांनी अनुभविली गायन, वादन आणि नृत्यप्रस्तुतीची अनुभूती
नगरपरिषद व नगरपचांयतीच्या सार्वत्रिक निवडणूकीकरिता २ डिसेंबर रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी
Pune: शहरात ३० नोव्हेंबर रोजी ‘नदी महोत्सव’ साजरा होणार