October 27, 2025

विनेश फोगाटचा महिला सुरक्षेवरून भाजपवर निशाणा

पुणे, १८ नोव्हेंबर २०२४: ‘‘भारतीय जनता पक्षाचे नेत्यांकडून ‘एक हैं तो सेफ हैं’ ची घोषणा देतात. मात्र, देशातील महिला सुरक्षित नाही. हे नेते महिलांचे शोषण थांबवतील तेव्हा महिला सुरक्षित होतील,’’अशी टीका करत काँग्रेसच्या आमदार विनेश फोगाट यांनी भाजपवर निशाणा साधला. तसेच ‘‘दिल्लीत भर रस्त्यांवर अन्यायाच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या महिला खेळाडू तुमच्या लाडक्या नव्हत्या का?’’ असा प्रश्नही फोगाट यांनी सोमवारी (ता.१८) पत्रकार परिषदेत उपस्थित केला.

काँग्रेस भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत फोगाट बोलत होत्या. काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, राष्ट्रीय प्रवक्त्या शमा महंमद, प्रदेश सरचिटणीस अॅड. अभय छाजेड, माजी आमदार दीप्ती चवधरी आणि शहर काँग्रेसच्या क्रीडा सेलचे अध्यक्ष आशुतोष शिंदे यावेळी उपस्थित होते.

फोगाट म्हणाल्या, नेत्यांकडून महिला खेळाडूंना शोषणाला बळी पडावे लागले आहे. सरकारविरोधी बोलल्याने आम्ही देशद्रोही ठरलो. निवडणूक जवळ आल्यानंतर लाडकी बहीण आठवते. पंतप्रधानांच्या कार्यालयापासून शंभर फुटांच्या अंतरावर महिला शोषणाविरोधात आवाज उठवत होत्या तेव्हा भाजपला बहिणींची आठवण आली नाही. सर्वात जास्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या महाराष्ट्रात होतात. महाराष्ट्रात शेतकरी आणि सामान्य माणूस भरडला जात आहे. शेतकऱ्यांच्या विरोधात धोरणे आखली जात आहेत, कायदे केले जात आहेत. त्याविरोधात दिल्लीत शेतकऱ्यांनी आंदोलन केले. त्यांच्याकडेही भाजप सरकारने लक्ष दिले नाही.

फोगाट म्हणाल्या, मी राजकारणात मोठे स्वप्न घेऊन आलेले नाही. खेळाडू म्हणून लैंगिक शोषणाविरोधात संघर्ष केला. पुन्हा ही लढाई कोणत्याही खेळाडूला लढावी लागू नये म्हणून मी राजकारणात आले आहे. महिलांना न्याय मिळावा यासाठी आम्ही संघर्ष केला. महिलांवरील अत्याचाराच्या घटना नागरिकांनी विसरू नयेत. सरकारने काय काम केले हे सांगण्याऐवजी भाजपकडून जात-धर्मावर समाजाची विभागणी करण्याचे काम सुरू आहे. भाजपचे नेते जाती-धर्मावरून लोकांमध्ये भांडणे लावत आहेत. भाजपने देशात द्वेष पेरण्याचे काम केले आहे. भाजपने विकासकामांचा प्रचार करून मते मागितली असती तर खेळाडू म्हणून मी देखील भाजपला दाद दिली असती.

खेळाडूंचा मेळावा…
‘‘खेळाडूंना चांगल्या दर्जाच्या सोयी-सुविधा मिळाव्या तसेच चांगल्या वातावरणात त्यांना आपला खेळ वाढवता यावा यासाठी मी खेळाडूंबरोबर कायम मैदानात उभी असेल. हरियाणापेक्षा महाराष्ट्रात जास्त चांगले खेळाडू आहेत. परंतु, त्यांना सरकारकडून प्रोत्साहन मिळत नाही. ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवून देशाचा गौरव वाढविणाऱ्या खेळाडूंना कसल्याही सोयी-सुविधा हे सरकार देत नाही. खेळाडूंसाठी चांगली मैदानेही नाहीत, महाविकास आघाडी चांगल्या दर्जाची मैदाने उभारेल,’’ असा विश्वास खेळाडू मेळाव्यात फोगाट यांनी व्यक्त केला.