October 27, 2025

मतदानाचा टक्का वाढला अन धाकधुकही वाढली

पुणे, २२ नोव्हेंबर २०२४: अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या विधानसभा निवडणुकीत पुणे जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदार संघांपैकी सर्वाधिक मतदानाचा टक्का हा पुणे कॅन्टोमेन्ट विधानसभा मतदार संघात वाढला आहे. गेल्या निवडणुकीच्या ( २०१९) तुलनेत या मतदारसंघात जवळपास साडेनऊ टक्क्यांहून अधिक मतदान वाढले आहे. तर जिल्ह्यातील पुरंदर विधानसभा मतदार संघातील मतदानाचा टक्का घसरला असून गेल्या वेळेस पेक्षा साडेपाच टक्के कमी मतदान झाले आहे. मतदानाचा टक्का व त्यामध्ये विशेषतः महिलांच्या मतदानाचेही प्रमाण वाढले असल्यामुळे हे वाढलेले मतदान कोणाच्या पारड्यात जाणार यामुळे उमेदवारांमध्ये वाढलेली आहे.

पुणे, पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीण भागात मिळून २१ विधानसभा मतदार संघ येतात. त्यापैकी दहा मतदार संघ हे ग्रामीण भागात, तर ११ मतदार संघ हे शहरी भागात येतात. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत यंदा २१ विधानसभा मतदार संघात मिळून मतदानाचा टक्का तीन टक्क्यांनी वाढला आहे. परंतु प्रत्यक्षात कोणत्या मतदार संघात किती टक्क्यांनी वाढ झाली आहे,हे तपासल्यानंतर सर्वाधिक वाढ पुणे शहरातील आठ विधानसभा मतदार संघात झाली आहे. हडपसर आणि कोथरूड वगळता उर्वरित सहा मतदार संघातील मतदानाचा टक्का हा पाच टक्क्यांहून अधिक वाढला आहे.

२१ विधानसभा मतदार संघांपैकी सर्वाधिक मतदानात इंदापूर मतदार संघाने आघाडी मारली आहे. या मतदार संघात ७६.१० टक्के मतदान झाले आहे. सर्वाधिक मतदान या मतदार संघात झाले असलेली, तरी प्रत्यक्षात गेल्या विधानसभा निवडणुकीची तुलना करता या मतदार संघातील मतदानात अर्धा टक्क्यांपेक्षाही कमी वाढ झाली आहे. त्याखालोखाल खेड-आळंदी मतदार संघात अर्धा टक्का, मावळ मध्ये जवळपास एक टक्का एवढीच वाढ झाली आहे. तर भोर विधानसभा मतदार संघात सर्वाधिक म्हणजे पाच टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. त्या खोला दौंड विधानसभा मतदार संघात साडेचार टक्के, तर पुरंदर वगळता उर्वरित मतदार संघात एक ते तीन टक्क्यापर्यंत मतदानात वाढ झाली आहे. पुरंदर विधानसभा मतदार संघात गेल्या वेळेस ६५.५६ टक्के मतदान झाले होते. यंदा त्यामध्ये साडेपाच टक्क्यांनी घट होऊन ६०.०२ टक्के इतकेच मतदान झाले आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात अल्पशी वाढ
तर पिंपरी-चिंचवड शहरात तीन विधानसभा मतदार संघ येतात. त्यामध्ये चिंचवड विधानसभा मतदार संघातील मतदानात यंदा सव्वा तीन टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्या खालोखाल भोसरी विधानसभा मतदार संघात दीड टक्क्यांनी, तर पिंपरी मतदार संघात सव्वा टक्क्यांनी मतदानात वाढ झाली आहे. पुणे शहर व ग्रामीण भागातील मतदानाच्या टक्केवारीची तुलना केली, तर पिंपरी-चिंचवड शहरातील तिन्ही मतदार संघात मिळून मतदानाच्या टक्केवारीतील वाढ ही समाधानकारक नसल्याचे दिसून आले आहे.

पुणे शहरात सर्वाधिक वाढ
ग्रामीण भागातील दहा आणि पिंपरी-चिंचवड शहरातील तीन मतदार संघांच्या तुलनेत पुणे शहरातील आठही विधानसभा मतदार संघातील मतदानामध्ये सर्वाधिक वाढ नोंदविली गेली आहे. विशेष म्हणजे मागील तीन निवडणुकांची आकडेवारी पाहिल्यानंतर पुणे कॅन्टोमेंन्ट विधानसभा मतदार संघातील मतदानाची टक्केवारी ही पन्नास टक्क्यांच्या आत राहिली. यंदा मात्र या मतदार संघात मतदानाच्या टक्केवारीने पन्नासचा आकडा तर ओलांडला. पण त्याबरोबर शहरातील आठही मतदार संघापेक्षा सर्वाधिक म्हणजे साडेनऊ टक्के मतदानात वाढ करून प्रथम क्रमांक मिळविला आहे. त्या खालोखाल वडगावशेरी मध्ये पावणे नऊ टक्के, तर कसबा मध्ये सव्वासात टक्क्यांनी गेल्या वेळेस पेक्षा मतदान वाढले असल्याचे समोर आले आहे. तर आठही मतदार संघात सर्वाधिक मतदार संख्या असलेल्या हडपसर विधान सभा मतदार संघात अन्य मतदार संघाच्या तुलनेत मतदानात पावणे तीन टक्क्यांनीच वाढ झाली आहे. तर त्या खालोखाल कोथरूड विधानसभा मतदार संघातील मतदानात यंदा ४ टक्क्यांनी वाढले आहे. तर उर्वरित शिवाजीनगर, पर्वती आणि खडकवासला या मतदार संघातील मतदारांच्या टक्केवारी सरासरी पाच ते सहा टक्क्यांनी वाढ झाली आहे.

निवडणुकीच्या रिंगणात प्रमुख सहा राजकीय पक्षांसह अपक्ष असे मिळून २१ विधानसभा मतदार संघात ३०३ उमेदवार रिंगणात होते. पंधरा दिवसांच्या प्रचारात मतदार राजामध्ये उत्साहाचे वातावरण अभावाने दिसून आले. परंतु मतदानाच्या दिवशी मात्र मतदारांमध्ये उत्साह असल्याचे यावरून स्पष्ट झाले आहे. मतदानाचा वाढलेला हा
टक्का कोणाच्या फायद्याचा ठरणार आहे,हे मतमोजणीच्या दिवशी स्पष्ट होणार आहे.
—————–

ग्रामीण भागातील दहा मतदारसंघ
मतदारसंघ – टक्केवारी (२०१९) – टक्केवारी (२०२४)—–वाढ (टक्क्यांमध्ये)
जुन्नर – ६७.३३ – ६८.४४——–१.११
आंबेगाव ६६.७७ ७०.०१———३.२४
खेड-आळंदी ६७.२७ ६७.७०——०.४३
शिरूर ६७.२१ ६८.५०—–१.२९
दौंड ६८.७१ ७३.२७—-४.५६
इंदापूर ७५.९२ ७६.१०—-०.१८
बारामती ६८.३८ ७१.०३—–२.६५
पुरंदर ६५.५६ ६०.०२——५,५४ (कमी)
भोर ६२.९३ ६८.०१—-५.०८
मावळ ७१.१६ ७२.१०….०.९४

——————
पिंपरी चिंचवडमधील तीन मतदारसंघ

मतदारसंघ टक्केवारी
चिंचवड — ५३.५९ —- ५६.७३—–३.१४
पिंपरी —- ५०.१७—- ५१.२९——१.१२
भोसरी — ५९.६३—- ६१.१४——-१.५१
———–
शहरी भागातील आठ मतदारसंघ

वडगावशेरी ४६.९२—– ५५.७१——–८.७९
शिवाजीनगर ४३.९६— ५०.९०——-६.९४
कोथरूड ४८.१७ —– ५२.१८——-४.०१
खडकवासला ५१.३५—- ५६.५३——५.१८
पर्वती ४८.९८—— ५५.२६——६.२८
हडपसर ४७.२५—– ५०.११——२.८६
पुणे कॅन्टोन्मेंट ४३.२८ —– ५२.८५——९.५७
कसबा पेठ ५१.५४ —— ५८.७६——७.२२
—————————-