पुणे दि. ६ डिसेंबर, २०२४ : आर्य संगीत प्रसारक मंडळाच्या वतीने देण्यात येणारा वत्सलाबाई जोशी पुरस्कार यावर्षी सवाई गंधर्वांचे नातू आणि भारतरत्न पं भीमसेन जोशी यांचे ज्येष्ठ शिष्य स्वर्गीय पं श्रीकांत देशपांडे यांना मरणोत्तर जाहीर करण्यात आला असल्याची घोषणा मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी यांनी केली.
भारतीय शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रात बहुमोल योगदान देणाऱ्या कलाकारांना २००७ सालापासून मंडळाच्या वतीने दरवर्षी वत्सलाबाई जोशी पुरस्काराने गौरविण्यात येते. रोख रु. ५१ हजार व मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप असून मुकुंदनगर येथील महाराष्ट्रीय मंडळाचे क्रीडांगण येथे १८ ते २२ डिसेंबर दरम्यान होणा-या ७० व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवात हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल.
सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवातील आणखी एक महत्वाचे आकर्षण म्हणजे प्रकाशचित्र प्रदर्शन. गेली पंधरा वर्षे दरवर्षी प्रकाशचित्रकार सतीश पाकणीकर हे एका विशिष्ट संकल्पनेवर आधारित असे प्रदर्शन महोत्सवादरम्यान सादर करत असतात. त्यांची यावर्षीची संकल्पना आहे नृत्य. ‘नृत्य-प्रभा’ असे या प्रदर्शनाचे नाव असून याविषयी माहिती देताना प्रकाशचित्रकार सतीश पाकणीकर म्हणाले की ‘नृत्यं गीतं तथा वाद्यं त्रयं संगीतमुच्यते!’ ही संगीताबद्दलची भारतीय संकल्पना आहे. त्यानुसार सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाच्या सुरुवातीच्या काळापासून दरवर्षी एका नृत्यशैलीच्या कलाकाराची कला सवाईच्या मंचावरून सादर होत आली आहे. गेल्या सहा दशकांत या स्वरमंचावरून सादर झालेल्या काही नृत्यकलांचे प्रकाशचित्रकारांनी जतन करून ठेवलेले काही क्षण यंदाच्या महोत्सवातील ‘नृत्य-प्रभा’ या प्रदर्शनातून आम्ही सादर करीत आहोत. या बरोबरच किराणा घराण्याच्या ज्येष्ठ व श्रेष्ठ गायिका स्वरयोगिनी पद्म विभूषण डॉ. प्रभा अत्रे यांना आदरांजली म्हणून त्यांच्याही प्रकाशचित्रांचा एक विभाग हे प्रदर्शनाचे दुसरे वैशिष्ठ्य असणार आहे.”
प्रकाशचित्रकार सतीश पाकणीकर, कै. अनिल देशपांडे व कै. सुधाकर जोशी यांनी टिपलेल्या या प्रकाशचित्रातून रसिक पुन्हा एकदा त्या मैफिलींच्या आनंदाचा अनुभव घेऊ शकतील. सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाच्या पाचही दिवसात महोत्सवाच्या आवारात हे प्रदर्शन रसिकांसाठी विनामूल्य खुले असेल असेही पाकणीकर यांनी नमूद केले.
याबरोबरच ७० व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाची तिकीटविक्री मंगळवार दि. १० डिसेंबरपासून सूरु होणार असून यावर्षी एरंडवणे येथील कमला नेहरू पार्क समोरील शिरीष ट्रेडर्स, शनिपार येथील बेहरे आंबेवाले, सहकारनगर येथील अभिरुची फुडस, कर्वे नगर येथील देसाई बंधू आंबेवाले, हेल्दी बगीचा, टिळक रस्ता येथील ग्राहक पेठ या ठिकाणी रसिकांना सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाची तिकिटे उपलब्ध होऊ शकणार आहेत.
संपूर्ण महोत्सवाच्या प्रवेशिका या खुर्चीसाठी रु ५ हजार व ३ हजार रुपये इतक्या असणार असून भारतीय बैठकीसाठी संपूर्ण महोत्सव प्रवेशिका या ५०० रुपये असतील. वर नमूद ठिकाणांव्यतिरिक्त ticketkhidakee.com येथे देखील महोत्सवाच्या ऑनलाईन प्रवेशिका उपलब्ध असतील याची कृपया नोंद घ्यावी.

More Stories
Pune: मला कुठलीही राजकीय किंमत मोजावी लागली तरी मोजायला मी तयार – माजी आमदार रवींद्र धंगेकर
HND जैन बोर्डिंगचे विश्वस्त श्री जयंत नांदुरकर यांना आचार्य श्री गुप्ती नंदीजी यांनी खडेबोल सुनवत खरेदी व्यवहार रद्द करण्यास सांगितले
Pune: जैन बोर्डिंग प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, मुख्यमंत्र्यांनी जैन बोर्डिंगसाठी १०० कोटी जाहीर करावे – धंगेकर