October 27, 2025

पुणे: बँड वाजवून चार दिवसात वसूल केले ११ कोटी

पुणे, ०६/१२/२०२४: मिळकतकराची थकबाकी वसूल करण्यासाठी महापालिकेने चार दिवसांपासून थकबाकीदाराच्या मिळकतीपुढे बँड वाजविण्यास सुरुवात केली आहे. त्यामधून दीडशे मिळकतींपुढे बँड वाजवून ११ कोटी १९ लाख ११ हजार ६१२ रुपयांची थकबाकी वसूल केली आहे. तर २३ मिळकतींना टाळे लावले आहे.

पुणे महापालिकेचे उत्पन्न वाढविण्याची मुख्य जबाबदारी मिळकतकर विभागाची आहे. महापालिकेचा खर्च वाढत असताना हा डोलारा सांभाळण्यासाठी दरवर्षी अर्थसंकल्पामध्ये मिळकतकर वसुलीचे लक्ष्यही वाढवले जात आहे. २०२४-२५ च्या अर्थसंकल्पात २७०० कोटी रुपयांचा कर वसूल करण्याचे उद्दिष्ट दिले आहे. १ एप्रिल ते ५ डिसेंबर या कालावधीत १४ लाख ८० हजार मिळकतींपैकी ८ लाख ७३ हजार २५७ मिळकतींनी १८०२ कोटी रुपयांचा कर भरणा केला आहे. चालू आर्थिक वर्ष संपण्यासाठी तीन महिने शिल्लक असून, या कालावधीत तब्बल ९०० कोटी रुपये वसूल करण्याचे आव्हान मिळकतकर विभागासमोर आहे.

तीन महिन्यात जास्तीत जास्त रक्कम वसूल होणे आवश्‍यक आहे. अनेक व्यावसायिक इमारती, गोदाम, कार्यालये यासह निवासी मिळकतींची थकबाकी सुमारे साडेचार हजार कोटी रुपये आहे. त्यात काही न्यायालयीन प्रकरणे आहेत. ते वगळून अन्य ठिकाणाची थकबाकी वसूल करण्यावर भर दिला जात आहे, असे उपायुक्त माधव जगताप यांनी सांगितले.

मिळकतकर विभागाने १५ क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील थकबाकीदारांकडून कर वसुलीसाठी बँड पथक तयार केले आहे. त्यामध्ये वादक आणि महापालिकेच्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. थकबाकीदारांच्या मिळकतीपुढे जाऊन बँड वाजवून पैसे वसूल केले जात आहेत. १५४ मिळकतधारकानी ११ कोटी १९ लाख रुपये चार दिवसात महापालिकेकडे जमा केले आहेत. तर कारवाईच्या धास्तीने नागरिकांनी स्वतःहून २० कोटी रुपयांचा भरणा या चार दिवसात केला आहे, असे जगताप यांनी सांगितले.