October 27, 2025

सहजीवन व्याख्यानमालेत गुरुवारी सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांचे ‌‘विश्वगुरू भारत‌’ विषयावर व्याख्यान

पुणे, १६/१२/२०२४: भारतीय स्वातंत्र्याला पूर्ण झालेली 75 वर्षे, जगातील सर्वात मोठी सुसूत्र सामाजिक संघटना असा लौकिक असलेल्या राष्ट्रीय स्वयंसवेक संघाचे 100व्या वर्षात पदार्पण आणि सहजीवन व्याख्यानमालेची रौप्य महोत्सवावकडे वाटचाल असा त्रिवेणी संगम साधत राष्ट्रीय स्वयंसेवक संघांचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांचे ‌‘विश्वगुरू भारत‌’ या विषयावर गुरुवारी (दि. 19) जाहीर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.

नामवंत वक्त्यांचा सहभाग आणि सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक तसेच आरोग्य अशा वैविध्यपूर्ण विषयांवर दरवर्षी सहजीवन व्याख्यानमाला आयोजित करण्यात येते. सहकारनगर येथे आयोजित करण्यात येत असलेली व्याख्यानमाला यंदा 23व्या वर्षात पदार्पण करीत आहे. यंदाही नियमित व्याख्यानमाला आयोजित करण्यात येणार आहे. 23व्या वर्षातील व्याख्यानाचे पुष्प डॉ. मोहन भागवत गुंफणार असून व्याख्यान गुरुवार, दि. 19 डिसेंबर 2024 रोजी सायंकाळी 6 वाजता फुलोरा प्ले ग्राऊंड, दशभुजा गणपती जवळ, सहकारनगर क्र. 2 येथे आयोजित करण्यात आले आहे, अशी माहिती सहजीवन व्याख्यानमालेचे अध्यक्ष विनय कुलकर्णी, ग्लोबल स्ट्रॅटेजिक पॉलिसी फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. अनंत भागवत, रवींद्र खरे, विजय ममदापूकर यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

आतापर्यंत आयोजित व्याख्यानमालेत अरुण साधू, चंदू बोर्डे, स्वामी स्वरूपानंद सरस्वती, अविनाश धर्माधिकारी, बाबासाहेब पुरंदरे, ले. जनरल डी. व्ही. शेकटकर, चित्तरंजन कोल्हटकर, प्रा. शिवाजीराव भोसले, डॉ. बालाजी तांबे, प्रा. मनोहर जोशी, फादर फ्रान्सिस दिब्रेटो, निळू फुले, द. मा. मिरासदार, जगद्गुरू शंकराचार्य (करवीर पीठ), डॉ. सदाशिव शिवदे, डॉ. मोहन धारिया, सिंधुताई सपकाळ, हृदयनाथ मंगेशकर, देवेंद्र फडणवीस, पृथ्वीराज चव्हाण, तात्याराव लहाने, डॉ. अभिजित सोनवणे, डॉ. गो. बं. देगलूरकर, प्रा. डॉ. स्वानंद पुंड, हभप चारुदत्त आफळे, डॉ. श्रीकांत परांजपे, राज ठाकरे, डॉ. कल्याणी नामजोशी यांच्यासह विविध क्षेत्रातील दिग्गज वक्त्यांनी हजेरी लावली असून 125 पेक्षा जास्त व्याख्याने झाली आहेत. सुमारे 47 वर्षांपूर्वी तत्कालिन सरसंघचालक बाळसाहेब देवरस यांचे सहजीवन व्याख्यानमालेत व्याख्यान झाले होते. त्यानंतर सहजीवन व्याख्यानमालेत सरससंघचालकांचे व्याख्यान आयोजित करण्याचा योग दुसऱ्यांदा जुळून आला आहे. गुरुवारी (दि. 19) आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.